मुंबई : मंत्रालयातील विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवार आणि शनिवारी राज्याचा दौरा करावा, असा आदेश मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी शनिवारी काढला. या दौऱ्यामध्ये या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित क्षेत्रिय कार्यालये व ग्रामीण/शहरी भागात स्वत: भेटी द्याव्यात व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच, जिल्ह्णाचे पालक सचिव म्हणून दौरा करताना त्यांनी जिल्ह्णातील विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा. क्षेत्रिय कार्यालयांना येणाऱ्या तक्रारींचे निवारण करावे, असे या आदेशात म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव हे त्यांच्या विभागांच्या योजनांचा आढावा घेऊन अंमलबजावणीचा प्रगती अहवाल मुख्य सचिवांना सादर करतील. त्यामध्ये योजनांचे स्वरुप व अंमलबजावणीत काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास तसा उल्लेख आपल्या अहवालात करतील. आढाव्यादरम्यान नजरेस आलेल्या त्रुटीदेखील ते दूर करतील. (विशेष प्रतिनिधी)कामगिरीवर नजरसचिवांनी केलेले दौरे हे त्यांच्या वार्षिक कार्यमूल्यांकन अहवालाचा (पीएआर) भाग समजण्यात येणार आहे. त्याचा विचार वार्षिक मूल्यांकन करताना केला जाणार आहे.सचिवांना राज्यात दौरे करता येणे शक्य व्हावे म्हणून मंत्री, राज्यमंत्र्यांनी महिन्याचा पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवार आणि शनिवारी मंत्रालय स्तरावर शक्यतो बैठकी घेऊ नयेत, असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश असल्याचे मुख्य सचिवांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.
मंत्रालयातील सचिवांना राज्यभर दौऱ्यांचे आदेश
By admin | Updated: January 3, 2016 02:28 IST