पुणे : इतर शहरांमधून येणारी जड वाहने पुणे शहराबाहेरून जाण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या आखणीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हाती घेणार आहे. रिंग रोडचा हा दुसरा टप्पा उर्से ते पौड रोडमार्गे खेड शिवापूर असा ६० किलोमीटरचा आहे. कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, सोलापूरकडून येणारी वाहने पुणे शहराच्या मध्यात न येता बाहेरून जाण्यासाठी सुमारे १६० किलोमीटरचा रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर हा रोड असणार आहे. हे काम एमएसआरडीसी करीत आहे. या रिंग रोडचे काम दोन टप्प्यात होणार आहे. याबाबत एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ म्हणाले, पहिल्या टप्प्यात उर्सेपासून चिंबळीफाटा मार्गे खेड शिवापूर हा सुमारे १०० किलोमीटरचा मार्ग आहे. त्यामध्ये पुणे-मिरज-कोल्हापूर रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि पुणे-मुंबई रस्ता आहे. तसेच, या मार्गात तीन रेल्वे क्रॉसिंग आहेत. या मार्गातील उर्से ते नाशिकफाटा हा मार्ग वगळता प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण होत आले आहे.रिंग रोडच्या दुसऱ्या टप्प्यात उर्से ते पौड रोडमार्गे खेड शिवापूर असा रस्ता बनविण्यात येणार असून, तो सुमारे ६० किलोमीटरचा आहे. या मार्गाची आखणी करण्याचे काम करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे याप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे ओहोळ यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यातील प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामध्ये चिंबळीफाटा ते खेड शिवापूर हा मार्ग आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.
रिंग रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या आखणीचे काम होणार सुरू
By admin | Updated: April 30, 2016 01:44 IST