मुंबई/नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून पाणी सोडण्यास रविवारी रात्री नऊ वाजता सुरुवात झाली. एकूण १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाणार आहे. पाण्याची चोरी होऊ नये, म्हणून गोदाकाठावर पोलीस तैनात करण्यात असून, गावांचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.नगरमधील निलवंडे धरणातून रात्री नऊ वाजता एक हजार क्युसेस, तर सकाळी सात वाजता दोन हजार क्युसेस पाणी सोडले गेले. निळवंडेमधून ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.मुळा धरणातून रविवारी रात्री नऊ वाजता दोन हजार क्युसेस, तर पहाटे पाच वाजता ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. सोमवारी सकाळी बारा वाजता सात हजार क्युसेस पाणी सोडले जाणार आहे. मुळा धरणातून १.७५ टीएमसी पाणी सोडले जाईल.नाशिकच्या गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा घेतला आहे. विसर्ग होणार असल्याने गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. गंगापूर ते जायकवाडी २२४ किमी अंतर आहे. दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने केलेल्या नियोजनानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, तसेच गिरणा खोऱ्यातून ४.३६ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने याला सर्वपक्षीय विरोध झाला, तर नगरच्या पाण्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली होती.
पाणी सोडण्यास प्रारंभ
By admin | Updated: November 2, 2015 03:34 IST