कोल्हापूर, दि. २५ - दुष्टांचा संहार, असुरांचा नि:पात करणा-या आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या या उत्सवाच्या पहिल्या माळेला देवीची सिंहासनस्थ बैठी रूपात पूजा बांधण्यात आली.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा कालावधी नवरात्रौत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज पहाटेपासूनच श्री महालक्ष्मीच्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला. काकडआरती, अभिषेक, पुण्यावहन, आदी विधी झाल्यानंतर सकाळी साडेसात वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना करण्यात आली. दुपारच्या आरतीनंतर देवीची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली.