युवक काँग्रेसचे आठ कार्यकर्ते जखमी : पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल नागपूर : महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे विधानभवनावर काढण्यात आलेल्या धिक्कार मोर्चावर आज सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला. यात आठ जण जखमी झाले. कार्यकर्त्यांनी कठडे तोडून विधानसभेकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करून १०० जणांना अटक करून सायंकाळी सोडण्यात आले. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिक पॅकेज मंजूर करून चांगली मदत करावी या मागणीसाठी युवक काँग्रेसने धिक्कार मोर्चा काढला होता. धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून हा मोर्चा निघणार होता परंतु ऐनवेळी मोर्चा कस्तुरचंद पार्कवरून निघाला. पोलिसांनी लिबर्टी टॉकीज चौकात मोर्चा अडविला. परंतु कार्यकर्त्यांनी येथील लाकडी कठडे तोडून विधानसभेकडे धाव घेतली. पोलिसांनी लागलीच जायका मोटार्सच्यासमोर आंदोलनकर्त्यांना कठड्यांच्या मदतीने अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी येथीलही कठडे तोडल्याने पोलिसांनी लाठीमार करावा लागला. यात पूर्व नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण पोटे, राकेश निकासे, चक्रधर भोयर, कुणाल पुरी, वैभव काळे, अनुप धोटे, नीलेश चंीद्रकापुरे, असत खान असे आठ जण जखमी झाले. लाठीमारामुळे पांगलेले काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा त्याच ठिकाणी एकत्र आले. सरकारच्याविरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळी आ. सुनील केदार व आ. गोपालदास अग्रवाल यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली. ही भेट होत नाही तोच पोलिसांनी २० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करीत शंभर कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांना पोलिसांच्या वाहनांत बसवून पोलीस लाईन टाकळी परिसरातील खुल्या कारागृहात घेऊन गेले. येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व प्रदेश सचिव मुन्ना ओझा यांच्यासह काँग्रेसचे इतर नेत्यांनी भेट दिली. मंगळवारी दोन्ही सभागृहात हा लाठीमारचा मुद्दा लावून धरू, असे आश्वस्त केले. सायंकाळी ५.३० वाजता अटक करण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. या मोर्चात महाराष्ट्र युवा काँग्रेसचा प्रभारी हिम्मत सिंग, महाराष्ट्र प्रभारी रुतवीज जोशी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव कुणाल राऊत, शहर युवा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, कुणाल पुरी, राकेश निकोसे, रोशन पंचबुद्धे, प्रवीण पोटे, रोहित खैरवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)
धिक्कार मोर्चावर लाठीमार
By admin | Updated: December 23, 2014 00:43 IST