प्रवासी भाड्यात ३० टक्क्यांपर्यंत वाढ : राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरीसुमेध वाघमारे - नागपूरसणासुदीच्या आणि सुट्यांच्या दिवसांत ट्रॅव्हल्स कंपन्या सर्रास प्रवासी भाडेवाढ करतात. तेव्हा प्रवाशांची लूट होत असल्याची ओरड होते. आता याचा फायदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळही घेणार आहे. अशा दिवसांमध्ये प्रवासी भाड्यात थोडी थोडक ी नव्हे तर तब्बल ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. याला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. यामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ‘एसटी’च्या ब्रीदवाक्याचे काय, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. गोरगरिबांचं प्रवासाचं साधन म्हणून आजही एसटीची ओळख आहे. राज्यातील सुमारे ७२ लाख प्रवाशांची दररोज ने-आण एसटी करते. असे असताना, एसटी महामंडळ आपल्या ब्रीदवाक्याला घेऊन जागत नसल्याचे राज्यातील चित्र आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात आजही शेकडो गावांत एसटी पोहचलेली नाही. प्रवासी खासगी वाहनांतून प्रवास करतात. यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडत आहे. दुसरीकडे महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे बस रिकाम्या धावतात. तोट्यातले एसटी महामंडळ आणखी तोट्यात जात आहे. नुकतेच डिझेलच्या भाववाढीवर उपाय म्हणून प्रवासी भाडेवाढ करण्यात आली. या भाडेवाढीने प्रवासी घटण्याची समस्या आहे. भाडेवाढ न केल्यास तोटा आणि भाडेवाढ केल्यास प्रवाशांकडून फिरवली जाणारी पाठ, अशा कात्रीत महामंडळ सापडले आहे. यात प्राधिकरणाने दिलेल्या या मंजुरीचा फायदा एसटी महामंडळ किती घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मागील वर्षी दिवाळीच्या दीड महिन्याच्यापूर्वीपासूनच ट्रॅव्हल्स कंपन्यानी आर्थिक लुबाडणूक सुरू केली होती. इतर दिवशी नागपूर-पूणे ८०० रुपये प्रवास भाडे असताना २८०० रुपये आकारले जात होते. आता एसटी महामंडळही इतर दिवसांत १०४८ भाडे असताना दिवाळीच्या कालावधीत ३० टक्के वाढीप्रमाणे १३६२ भाडे आकारण्याची शक्यता आहे. फक्त दिवाळीच नाहीतर सुट्या, सप्ताह अखेर, अधिकतम गर्दी किंवा घाईगर्दीचा कालावधी या दरम्यान प्रवासी भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कमी गर्दीच्या कालावधीत तीस टक्क्यांपर्यंत भाडे कमी करण्याची परवानगीही प्राधीकरणाने दिली आहे. या संदर्भातील अधिसूचना देण्यात आल्या आहेत.
सणासुदीच्या दिवसांत एसटी महागणार!
By admin | Updated: July 4, 2014 01:15 IST