पुणे : प्रवाशांना तिकीटासाठी स्वाईप मशिन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) टोलभरणाही डिजिटल होणार आहे. राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर एसटीकडून ई-टॅग प्रणालीच्या माध्यमातून टोल भरला जाणार आहे. त्यासाठी एसटीला टोलमधून दहा टक्के सवलत मिळणार आहे. एका खासगी बँकेच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये संबंधित मार्गावरून ये-जा करणाऱ्या बसला बारकोड लावला जाईल. बस टोलनाक्यावर गेल्यानंतर सेन्सरच्या माध्यमातून बसवरील बारकोड स्कॅन केला जाईल. त्याआधारे टोलचे पैसे जमा होतील. त्यासाठी एसटीकडून संबंंधित बँकेत आधीच टोलचे पैसे भरले जाणार आहेत. बारकोडमध्ये बस क्रमांकासह मार्ग, टोल, टोल शुल्क अशी आवश्यक सर्व माहिती टाकली जाणार आहे, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सध्या केवळ राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवरहीच ही प्रणाली वापरली जाणार आहे. एसटीच्या पुणे विभागात ही प्रणाली महिनाभरात कार्यान्वित होणार आहे. (प्रतिनिधी)
एसटी टोलभरणा डिजिटल
By admin | Updated: February 7, 2017 05:08 IST