पुणे : रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने १०० बसची व्यवस्था केली होती. त्याला प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई (सीएसटीएम) रेल्वे मार्गावरील हँकॉक पूल रविवारी पाडण्यात आला. त्यासाठी १०० लोकल आणि ४२ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी मध्य रेल्वेवर १८ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. नोकरीनिमित्त तसेच इतर कामांसाठी दररोज पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. मात्र, रविवारी सुट्टीमुळे ही गर्दी कमी असते. तरीही बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने जादा गाड्यांची सोय केली. शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून ते रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. एसटीने १०० गाड्यांचे नियोजन केले असले तरी सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमी राहिली. (प्रतिनिधी)
एसटीने दिली मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना साथ
By admin | Updated: January 11, 2016 01:37 IST