अकोला: राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींंना सुधारित रकमेनुसार वेतनाच्या ९0 टक्के निकषाप्रमाणे विद्यावेतन लागू करण्याचा निर्णय २२ सप्टेंबर २0१४ रोजी घेण्यात आला होता. ७ एप्रिल २0१५ मध्ये तातडीने विद्यावेतनात वाढ करण्याची सूचना महामंडळाने केल्यानंतरदेखील अद्यापपर्यंंत प्रशिक्षणार्थींंना सुधारित वेतनवाढ मिळाली नाही. यामुळे महामंडळाच्या अमरावती, अकोला, यवतमाळ विभागातील प्रशिक्षणार्थींंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, अकोला विभागात धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशिक्षणार्थींंनी दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागवार कार्यशाळेत बसेसची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षणार्थींंची नियुक्ती करण्यात आली. जीव धोक्यात घालून तांत्रिक कामे करणार्या प्रशिक्षणार्थींंना अवघे २ हजार ४00 ते २ हजार ८00 रुपये वेतन विभागानुसार दिले जाते. यासंदर्भात केंद्र शासनाच्या २२ सप्टेंबर २0१४ मधील निर्णयानुसार महामंडळात कार्यरत कर्मचार्यांच्या वेतनाच्या ९0 टक्के रकमेनुसार विद्यावेतन मंजूर करण्याचे निर्देश होते. आठ महिने उलटून गेल्यावरदेखील महामंडळाने वाढीव विद्यावेतन मंजूर केले नाही. मध्यंतरी ७ एप्रिल रोजी महामंडळाने विद्यावेतनात वाढ करण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले होते. आजपर्यंंतही याची अंमलबजावणी न झाल्याने प्रशिक्षणार्थींंना विद्यावेतनापासून वंचित राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा विभागात हीच परिस्थिती असून, अकोला विभागातील प्रशिक्षणार्थींंनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यावेतन लागू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जाईल. महामंडळाने तशा सूचना जारी केल्या असतील तर निश्चितच पुढील प्रक्रिया पार पडेल. प्रशिक्षणार्थींंना हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रश्नच नसल्याचे एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम.बी. पठारे यांनी सांगीतले.
*परिवहन मंत्री विदेशात
जीव धोक्यात घालून एसटीची दुरुस्ती करणार्या प्रशिक्षणार्थींना अत्यल्प वेतनात कामकाज करावे लागते. या मुद्यावर महामंडळाची भूमिका उदासीन दिसते. यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते विदेशात असल्याची माहिती आहे.