मुंबई : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीने आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेत वाय-फाय सुविधा सुरू केली जात असताना आता एसटी महामंडळानेही मोफत वाय-फाय सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या व पुण्याहून अन्य मार्गांसाठी सुटणाऱ्या ५० बसमध्ये येत्या दहा दिवसांत वायफाय उपलब्ध होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करत प्रवास सुखकर आणि आनंददायी होण्याच्या दृष्टीने प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने बसमध्येच वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर गेल्या काही महिन्यांपासून कामही सुरू होते. अखेर त्याला एसटी महामंडळाकडून अंतिम स्वरूप देण्यात आले आणि सुरुवातीला ५0 बसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला. प्रवास करताना प्रवाशांना व्यक्तिगत मनोरंजनासाठी वाय-फायच्या सहाय्याने प्रवासात चित्रपट, गाणी, बातम्या ऐकायला व बघायला मिळणार आहेत. वाय-फाय सुविधा मिळविण्यासाठी बसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्मार्ट फोनमधील वाय-फाय सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. त्यानुसार फोनमधील इंटरनेट ब्राऊझर अॅप उघडल्यानंतर त्यांनी कंपनीने दिलेला यूआरएल (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) पत्ता टाईप केल्यावर प्रवाशांची प्राथमिक माहिती विचारली जाईल आणि ती माहिती भरल्यानंतर एक मेन्यू प्रवाशांच्या स्मार्ट फोनवर दिसेल. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट व गाणी, बातम्या, लहान मुलांसाठी कार्टून चित्रपट, टिव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका असा मनोरंजनाचा खजिना उघडला जाईल. त्यातून प्रत्येक प्रवाशाला त्यापैकी काहीही बघणे व ऐकणे शक्य होईल. ही सुविधा प्रवाशांना मोफत असेल. येत्या दहा दिवसांत वाय-फाय सुविधा सुरुवातीला ५0 विविध प्रकारच्या बसमध्ये सुरू केली जाणार आहे. त्याचा जवळपास एक महिना आढावा घेतल्यानंतर उर्वरीत बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करायची की त्यात काही बदल करण्याची गरज आहे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता एसटीही होणार ‘वाय-फाय’
By admin | Updated: August 17, 2016 04:18 IST