अकोला : गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या कंपनीचा संचालक समीर जोशी याला मंगळवारी प्रथमच जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मंगळवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावनी होती; मात्र न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता २ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. समीर जोशी याला नागपूर कारागृहातून अकोल्यात आणण्यात आले होते. श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी अकोल्यासह राज्यातील अनेक शहरांमधील गुंतवणूकदारांना कंपनीच्या विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केलेली रक्कम दामदुप्पट व भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील नागरिकांना कोट्टय़वधी रुपयांनी गंडविले आहे. या प्रकरणी समीर जोशी, त्याची पत्नी पल्लवी व एजंटवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. समीर जोशी नागपूर कारागृहात असून, त्याच्या पत्नीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ात समीर जोशीच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होती; मात्र सरकार पक्षाने वेळ मागितल्यामुळे समीर जोशी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी २ जुलैपर्यंंत पुढे ढकलली आहे. या प्रकरणी आरोपीतर्फे अँड. आशीष देशमुख यांनी तर सरकार पक्षातर्फे अँड. मो. परवेज डोकाडिया यांनी कामकाज पाहिले.
श्रीसूर्या घोटाळय़ाचा म्होरक्या समीर जोशीची न्यायालयात पेशी
By admin | Updated: July 1, 2015 01:40 IST