मुंबई : शुक्रवारी दिवसभर सुरु असलेला पाऊस यामुळे तीनही मार्गांवरील लोकलच्या वेगावर परिणाम झाला आणि त्याचा वेग फारच मंदावला. तब्बल वीस मिनिटे ते अर्धा तास लोकल उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेकडून २0 टक्के, तर पश्चिम रेल्वेकडून ६0 लोकल फेऱ्या कमी चालवण्यात आल्या. त्याचप्रमाणे अनेक मेल-एक्सप्रेस रद्दही करण्यात आल्या. शुक्रवारी रात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने शनिवारी लोकल सेवा पुर्ववत झाली. मात्र सकाळपासून पावसाने पकडलेल्या जोरामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेला पुन्हा त्याचा फटका बसला. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील सीएसटी ते कर्जतपर्यंतची वाहतुक तब्बल अर्धा तास उशिराने धावत होती. ठाणे ते वाशीपर्यंतच्या वाहतुकीलाही लेटमार्क लागत होता. मध्य रेल्वेने सकाळच्या सुमारास काही वेळेसाठी जलद लोकल धीम्या मार्गावर वळविल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची लोकल पकडताना धांदल उडत होती. हीच परिस्थीती पश्चिम रेल्वे मार्गावरही होती. लोकल वीस मिनिटे उशिराने धावत असल्याने दादरपासून ते बोरीवलीपर्यंतच्या स्थानकांवर गर्दीचे चित्र होते. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच लोकलमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्यात मोठा तांत्रिक बिघाड झाला असून या लोकल पुन्हा सेवेत येण्यास दोन दिवस लागणार आहेत.
मुंबापुरीत रेल्वेचा वेग मंदावला
By admin | Updated: June 21, 2015 01:39 IST