मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने आठ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दोन गाड्या नागपूर ते पंढरपूर या मार्गावर आणि सहा गाड्या मिरज ते पंढरपूर या मार्गावर धावतील.०१२१२ ही विशेष गाडी नागपूर येथून १३ जुलै रोजी सकाळी ८.२० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता ती गाडी पंढरपूर येथे पोहोचेल. ०१२११ विशेष गाडी १६ जुलै रोजी सकाळी ८.०५ वाजता पंढरपूर येथून निघेल; आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १.४० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी अजनी, वर्धा, पूलगाव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डूवाडी या स्थानकांवर थांबेल. ०१४०१ विशेष गाडी १५, १६ आणि १७ जुलै रोजी पंढरपूर येथून सकाळी १०.४५ वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी १.०५ वाजता मिरजला पोहोचेल. ०१४०२ ही विशेष गाडी १५, १६ आणि १७ जुलै रोजी मिरज येथून १.३० वाजता निघेल आणि ५.०५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. ही गाडी सांगोला, जथरोड, ढळगाव, कवठे-महांकाळ, सुलगारे व अरग या स्थानकांवर थांबेल. दरम्यान, या गाड्यांसाठीचे आरक्षण सुरू झाले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
आषाढीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या
By admin | Updated: July 10, 2016 04:06 IST