अकोला : राज्यात सध्या सोयाबीनचे दर ३ हजार ७00 रुपये प्रतिक्विंटल असून, या दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेत व्यापारी वतरुळात वर्तविण्यात येत आहेत. विदर्भात यावर्षी शेतकर्यांनी १५ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. पण, पाऊसच नसल्याने सोयाबीन उत्पादकांच्या हाती निराशा आली आहे. सोयाबीनचा उतारा एकरी ९ ते १0 क्विंटल येत होता, तो यावर्षी कमी झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. हमीभावात यावर्षी अपेक्षित वाढ झाली नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली होती; परंतु मध्य प्रदेशात २0 लाख टन सोयाबीनचे उत्पादन घटल्याने सोयाबीन दरात तेजी आली आहे. २0१३-१४ ला अतवृष्टीने सोयाबीन काळे पडले, तर २0१४-१५ मध्ये पाऊसच नसल्याने सोयाबीनचे बी बारीक झाले. त्यामुळे गतवर्षी सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकर्यांना संघर्ष करावा लागला होता. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. कीटकनाशके फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना खासगी बाजारात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव २९00 ते ३१00 रुपयांहून पुढे सरकले नव्हते. त्यातच प्रतवारीचे निकष लावून सोयाबीन खरेदी केले जात होते. पण, या सोयाबीनला ३२४0 रुपये क्विंटलपर्यंंत भाव दिला जात होता. उर्वरित सोयाबीन मात्र २६00 ते ३000 हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केले जात होते. पण, २0१५-१६ च्या खरीप हंगामात अचानक सोयाबीन दरात तेजी आली असून, ओल्या सोयाबीनला ३१00 रुपये, तर वाळलेल्या सोयाबीनला ३७00 रुपये प्रतिक्विंटल दराने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी केले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत तीन दिवसांपासून सोयाबीनची आवक सुरू झाली असल्याचे सांगीतले. सुरुवातीचे दोन दिवस एक हजार क्विंटल होती. बुधवारी यात वाढ होऊन ४ हजार क्विंटल आवक वाढली आहे. एकंदरित बघता सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सोयाबीनचे दर पोहोचले ३७00 रुपये प्रतिक्विंटलवर!
By admin | Updated: October 7, 2015 22:52 IST