मुंबई - आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मॅनेजरला मारहाण केलेले आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहे. दक्षिण भारतातील लोकांनी महाराष्ट्र नाचवला. लेडीज बार, डान्सबारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद केली. महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका का येतो, मी जे केले मराठी माणसासाठी केले असं सांगत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजर मारहाण प्रकरणावर भाष्य केले आहे. संजय गायकवाड यांच्या कृत्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मी जे केले ते इथल्या माणसांसाठी केले मग दक्षिण भारतीयांचा तुम्हाला पुळका का आलाय? जर समज देऊन, तक्रार देऊन हे सरळ होत नसतील तर या मार्गाने तात्काळ कारवाई झाली हे आपण पाहिले. मग माझा निर्णय चुकीचा होता की योग्य होता ठरवा. शेवटी ती मारहाण होती. मला आयपीसी कायदे वैगेरे माहिती आहेत. हे फक्त एनसीचे प्रकरण आहे. यात कायद्यानुसार कुठेही शिक्षेची तरतूद नाही. मीपण केसेस लढल्या आहेत. विधान भवनाच्या आत हे असल्याने मी अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना माझी बाजू समजवून सांगेन. माझी चूक असेल तर त्याला जी शिक्षा असेल त्याला सामोरे जायला मी तयार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मार्ग माझा चुकीचा होता हे माहिती होते पण या घटनेसाठी मला करावे लागले. मी वेटरला नाही तर मॅनेजरला मारले. २००-४०० तक्रारी गेल्या ४-५ वर्षात झाल्यानंतरही कॅन्टीनवर कारवाई केली नाही. कारवाईसाठी सांगूनही २-२ महिने अहवाल यायचा नाही. यामागे कुणाचे साटेलोटे होते, हा माणूस लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. मला स्वत:ला पोटाचा आजार आहे. काही वेडेवाकडे खाल्ले तर मला त्रास होतो. त्यामुळे मी कधी बाहेरचे खात नाही. मला इतके विषारी जेवण दिले जात असेल त्यानंतर माझी जी रिअँक्शन होती ती चुकीची वाटत नाही असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं.
दरम्यान, अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई झाली. त्यामुळे माझा मार्ग चुकीचा होता तरीही मला तो अवलंबावा लागला. त्यामुळेच आज ही कारवाई झाली. येणाऱ्या काळात लाखो लोकांचे आरोग्य त्यातून वाचणार आहे असंही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.