डोंबिवली/कल्याण : महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे. त्यामुळे संबंधित परप्रांतीय येथील घरे विकून आजमगढ, प्रतापगढ आदी ठिकाणी स्थिरावतात. हे चित्र नको असेल तर मला सत्ता दिल्यास सत्तेच्या पहिल्याच दिवशी झोपडपट्ट्यांचा विषय निकाली लावेन, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. भाषणाच्या शुभारंभाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवलीतील डीएनसीच्या मैदानातील सभेत त्यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील युवक-युवतींनाच रोजगाराची संधी देण्यात येईल. परप्रांतीयांनी येथून त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जावे. त्यांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही. आपण त्यांना सर्व सुविधा द्यायला, हा काय कबुतरांचा खुराडा आहे का, अशा शब्दांत त्यांनी परप्रांतीयांवर टीकेची झोड उठवली. राज्यात ५५ वर्षे ज्यांची सत्ता आहे त्यांनी आतापर्यंत ना रस्ते दिले, ना अखंड वीज दिली. केवळ खड्डेमुक्त रस्त्यांचा नारा दिला. त्याची पूर्तता करण्यासाठी काय रॉकेट सायन्स आहे का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.सीमेवर जवान शहीद होत असताना मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात दंग आहेत, ही शोकांतिका नाही का? देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रचाराला येतो, यावरूनच येथील त्या पक्षाच्या नेत्यांची काहीही लायकी नाही, असे स्पष्ट होत आहे. स्व. गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागले नसते, असे खुद्द मोदींनीच बीडच्या सभेत स्पष्ट केले. आता आगामी काळात कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या महापालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका होत आहेत. त्यालाही पंतप्रधान येतील. केवळ पक्ष प्रचारासाठी पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून हिंडणारा अशी त्यांची जागतिक कीर्तीची ख्याती होत आहे. मोदींनी कितीही सभा घेवो, मला त्याची फिकीर नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपाच्या होर्डिंग्जवर मोदींचा फोटो लावावा लागतो, ही त्यांच्या येथील नेत्यांची शोकांतिका असल्याची टीका त्यांनी केली.महायुतीसह आघाडीच्या फुटीबाबतही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे सर्व प्री-प्लॅन होते. मात्र जनतेला नेहमीप्रमाणेच फसवले गेले. त्यांना या वेळेसही गृहीत धरले गेले आणि म्हणूनच महायुती तुटली की आघाडी तुटणार, हे समीकरण सहा महिन्यांपूर्वीच ठरल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.(प्रतिनिधी)
सत्ता मिळताच झोपड्यांचा प्रश्न सोडवू
By admin | Updated: October 7, 2014 05:43 IST