नृसिंहवाडी : दोन चाकावर देशभर प्रवास करणाऱ्या नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील सोमण बंधूंच्या मोटार पळविण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. जवळजवळ एक तपाहून अधिक काळ त्यांनी मोटारसायकलवरून प्रबोधन करीत हजारो मैलांचा प्रवास देशभर करून आपल्या जिद्दीला परिसरातून सलाम मिळविला आहे.सुमारे १५ हजार ८८२ किलोमीटर प्रवास अवघ्या २३ दिवस व १४ तासांमध्ये दोन भावांनी स्वतंत्र गाडीवरून केला आहे. नागेश सोमण व प्रभाकर सोमण अशी विक्रमवीरांची नावे आहेत. यांची दखल घेत लिम्का बुकचे प्रमुख एडीटर विजया घोष यांनी त्यांना लिम्का बुकमध्ये विक्रमाची नोंद झाल्याचे पत्र दिले आहे. लहानपणापासून दोनचाकी गाडीचे कमालीचे वेड व छंद असणाऱ्या नागेश सोमण यांनी प्रथम २००३ मध्ये मोटारसायकलीवरून १३ दिवसांत जम्मू-काश्मीर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी हे सात हजार पाचशे किलोमीटर पूर्ण केले. पहिल्या यशस्वी पर्यटनामुळे आत्मविश्वास बळावला व त्याच जोरावर २००५ मध्ये कोलकाता, काठमांडू, वाराणसी हा आठ हजार तीनशे किलोमीटरचा प्रवास चक्क १४ दिवसांत पूर्ण केला. प्रवास करताना राज्यांच्या चालीरिती समजून घेत ‘लेक वाचवा’, ‘झाडे लावा’, ‘पाण्याचा वापर काटकसरीने करा’ हे प्रबोधन करायला ते विसरले नाहीत. २०१४ मध्ये अधिकाधिक प्रवास करून यावेळी लिम्का बुकमध्ये विक्रम करण्याची गाठ मनाशी बांधून नागेश सोमण व प्रभाकर सोमण या दोन बंधूंनी ३ मार्च २०१४ ला प्रवासास प्रारंभ केला. यामध्ये देशातील २९ राज्ये व चार केंद्रशासित प्रदेश असा २३ दिवसांत १५ हजार ८८२ किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. (वार्ताहर)
सोमण बंधूंची लिम्का बुकात नोंद
By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST