नितीन गडकरींचा आरोप : पृथ्वीराज चव्हाणांसोबत रंगली जुगलबंदीनागपूर : विदर्भ विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी ‘मिहान’चा योग्य उपयोग करता आला असता. परंतु या अगोदर सत्तेवर असणाऱ्या आघाडी शासनाच्या हलगर्जीमुळे ‘मिहान’ची दुरवस्था झाली आहे असा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. दुसरीकडे भाजपकडून आमच्याच कार्यकाळातले प्रकल्प नव्याने घोषणा करून आणल्या जात असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेन्ट) सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेन्ट’ या चर्चासत्रादरम्यान या दोन्ही नेत्यांची निरनिराळ््या मुद्यांवर चांगलीच जुगलबंदी उपस्थितांना अनुभवायला मिळाली. विधानसभा निवडणुकांदरम्यान केलेले आरोप-प्रत्यारोप बाजूला सारत गडकरी व चव्हाण पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले होते.सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चासत्रात या दोन्ही दिग्गज नेत्यांनी निरनिराळ््या मुद्यांवर परखड मत व्यक्त केले. एखाद्या प्रश्नावर समोरच्याला प्रत्युत्तर देणे, मध्येच एखाद्या वाक्यावर चिमटा काढणे आणि दावे-प्रतिदावे यामुळे चर्चासत्र चांगलेच रंगले. येणाऱ्या काळातील राजकारण हे विकासाधिष्ठितच राहील असे मत दोघांनीही यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र परिख, सचिव राहुल उपगंलावार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वेद’चे माजी अध्यक्ष विलास काळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. ...तर अविश्वास प्रस्ताव आणाभाजपकडे बहुमत नसतानादेखील १२ नोव्हेंबर रोजी विधानसभेत आवाजी मतदानाच्या आड झालेला प्रकार हा चुकीचा होता. राज्यातील सरकार हे अवैध आहे. न्यायालयात आम्ही याला आव्हान दिले आहे. भाजपला बहुमत सिद्ध करावेच लागेल असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावर काँग्रेसने नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अविश्वास प्रस्ताव आणावाच असे आव्हान गडकरी यांनी दिले. कोणाच्या आरोपावरून राज्य सरकार अवैध ठरत नाही. जे आरोप करतात त्यांनी उघडपणे सामना करावा. एकदाची कुस्ती होऊन जाऊच द्या या शब्दांत गडकरी यांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले.संघाचा हस्तक्षेप नाहीसंघाच्या इशाऱ्यांवर केंद्राचे सरकार चालते अशी टीका चव्हाण यांनी केली. त्यावर गडकरी यांनी तत्काळ जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे अशी टीका करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात संघाकडून कधीही राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येत नाही. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत कधीही कुठलाही आदेश देत नाहीत असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केली. भ्रष्टाचार अन् आघाडीमुळे फटकाकेंद्र व राज्यात संपुआ तसेच आघाडी सरकारने कधीही झाली नाहीत इतकी विकासकामे केली. परंतु भ्रष्टाचाराची समोर आलेली प्रकरणे, आकडेवारी तसेच आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसला फटका बसला. माहितीच्या अधिकारातून बरेचसे भ्रष्टाचार समोर आले व त्यातून जनता आणि विशेषत: युवावर्गाने आम्हाला नाकारले असे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिपादन केले. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती दोषी सिद्ध झाली तर कठोर शिक्षा व्हायला हवी. परंतु लवकर निर्णय येत नाही व त्यामुळे अशा लोकांमध्ये कायद्याबाबत भीतीच नाही असेदेखील ते म्हणाले. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी काही कायद्यांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. तुम्ही केलेला विकास जनतेला बहुतेक दिसलाच नाही या शब्दांत गडकरी यांनी चव्हाण यांना चिमटा काढला.
‘मिहान’च्या दूरवस्थेला आघाडीच जबाबदार
By admin | Updated: November 24, 2014 01:21 IST