पुणे : सोबत काम करणाऱ्या कामगाराचा दुसऱ्या कामगाराने गळा चिरून खून केल्याची घटना घोले रोडवरील क्षेत्रीय कार्यालयाजवळील कृष्णा ज्यूस बारमध्ये सोमवारी मध्यरात्री घडली. ही घटना सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुड्डू गौतम (वय २०, रा. बैराईज, लखनौ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बळीराम अशानंद तिवारी (वय १९, रा. दुल्हीन बाजार, राजीपुरा, पटना, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दुकानमालक विशाल रमेश कटारकर (वय ४२, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारकर यांचे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाजवळच्या एमजेएम रुग्णालयासमोर कृष्णा ज्यूस बार आहे. दुकानाची वेळ दुपारपासून रात्री अकरापर्यंत असते. कटारकर यांच्या दुकानात तिवारी पाच दिवसांपूर्वी कामाला आला होता. तो दुकानातच झोपत असे. या दुकानाशेजारी असलेल्या चहा नाष्ट्याच्या हॉटेलमध्ये गुड्डू गौतमचे मित्र काम करतात. तो त्यांना भेटण्यासाठी मागील पाच-सहा दिवसांपासून येत होता. सध्या कोणतेही काम नसलेल्या गुड्डूला काम देण्याची, तसेच दुकानामध्येच झोपू देण्याची विनंती त्याच्या मित्रांनी कटारकर यांना केली होती. त्यानुसार त्याला कामावर ठेवून घेण्यात आले. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास जेव्हा कटारकर यांनी दुकान उघडले तेव्हा गुड्डू रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. उपायुक्त सुधीर हिरेमठ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, गुन्हे शाखा युनिट एकचे रघुनाथ फुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या गाड्या लागल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी घोले रस्त्यावर झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडीही झाली होती. पोलिसांनी बघ्यांना हुसकावून लावत वाहतूक सुरळीत केली. ।कृष्णा ज्यूस बारमध्ये दररोज माल टाकणारा टेम्पोचालक येतो. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सहा वाजता आलेल्या चालकाला दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्याने आतमध्ये डोकावले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक जण दिसला. त्यांनी शटर खाली ओढून कटारकर यांना तत्काळ माहिती दिली. सकाळी सहाच्या सुमारास माहिती मिळूनही कटारकर अकरा वाजता दुकान उघडण्यासाठी आले. एवढी गंभीर घटना घडूनही त्यांनी उशीर का लावला, याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.
घोले रस्त्यावर कामगाराचा खून
By admin | Updated: May 17, 2016 01:05 IST