कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने केलेल्या आरोपाची न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी या आरोपाची गोपनीय चौकशी सुरू केली आहे. समीरला ९ आॅक्टोबरला न्यायालयात हजर केले होते. त्यादिवशी त्याच्या सुरक्षेसाठी उपस्थित असणाऱ्या अधिकारी व पोलिसांचे जाब-जबाब घेण्यास सुरुवात केली आहे तसेच त्या दिवसाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेल्या चित्रीकरणाची सीडी मिळविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याने शनिवारी न्यायालयीन कोठडीतून व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी ९ आॅक्टोबरला ब्रेन मॅपिंग सुनावणीसाठी कसबा बावडा येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पायऱ्या चढताना एका अनोळखी पोलिसाने माझ्या कानात मी पोलीस असून साहेबांचा तुझ्यासाठी निरोप आहे. ‘सामाजिक संघटनांचा पोलिसांवर दबाव आहे. अन्य साक्षीदारांची नावे सांग, ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी हो म्हण, त्यासाठी तुला माफीचा साक्षीदार बनवून २५ लाख रुपये देतो. नाही म्हटलास तर तुला फासावर लटकविण्याची तयारी आम्ही केली आहे,’ अशी धमकी दिल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांनी तपास अधिकारी एस. चैतन्या यांना समीरच्या या तक्रारीची सखोल चौकशी करून ५ डिसेंबर २०१५ पर्यंत न्यायालयास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी ही चौकशी सुरू केली आहे. समीरला न्यायालयात ज्या-ज्यावेळी हजर केले त्यावेळी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्याला सुमो गाडीतून आणले जात होते तेथून त्याच्या तोंडाला बुरखा घालून न्यायालयात नेले जात असे. त्याच्याभोवती पोलिसांचे सुरक्षा कवच असायचे. त्यातूनही अनोळखी पोलीस त्याच्या जवळ गेला कसा? तो कोण होता? की समीर पोलिसांची दिशाभूल करत आहे. या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. समीरच्या अवती-भोवती असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे जबाब घेणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
समीरच्या आरोपाची चौकशी सुरू--गोविंद पानसरे हत्या प्रकरण
By admin | Updated: November 23, 2015 00:27 IST