वन विभागाची कारवाई : छत्तीसगडच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना भंडाऱ्यात पकडले भंडारा : वाघाच्या कातडीची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना भंडारा व गोंदिया वन विभागाच्या भरारी पथकाने अटक केली. ही कारवाई भंडारा येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलसमोर रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. या वाघाची शिकार महाराष्ट्रात झाली असावी, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. तन्ने खॉ अहमद खॉ (५५) रा. बनारगट्टा ता. डोंगरगड जि. राजनांदगाव (छत्तीसगड), विकास सुदाम मरस्कोल्हे (२६) रा. दावेझरी ता.तुमसर व जगदीश बाभरे (२७) रा. बेला (भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तन्ने खॉ अहमद खॉ हा वाघांच्या कातडीची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार आहे.तन्ने खॉ हा वाघाची कातडी घेऊन भंडारा येथे येणार असल्याची माहिती भंडारा वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार, रविवारी सकाळपासूनच भंडाऱ्याचे वन अधिकारी त्याच्या पाळतीवर होते. परंतु, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. तन्ने खॉ याने तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील विकास मरस्कोल्हे या तरुणाला वाघाची कातडी विकण्यासाठी संपर्क केला होता. त्यानंतर तन्ने खॉ, विकास मरस्कोल्हे व व्हॅन चालक जगदीश बाभरे हे तिघेही व्हॅन क्रमांक एम.एच. ३०/पी.१८४८ ने रविवारी सकाळी राजनांदनगाव जिल्ह्यातील पनीयाजोब येथे गेले. तिथून वाघाची कातडी व्हॅनमध्ये टाकून ते भंडाराकडे येत होते. दरम्यान भंडारा येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलसमोर वनविभागाच्या पथकाने या वाहनाची झडती घेतली असता त्यात वाघाचे कातडे आढळून आले. कातडे ताब्यात घेऊन तिघांनाही अटक केली. याप्रकरणी वन विभागाने तिन्ही आरोपींविरुध्द भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई भंडाराचे उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांच्या मार्गदर्शनात फिरते पथकाचे प्रमुख भाऊराव राठोड यांच्या नेतृत्वात भंडारा-गोंदिया वन्यजीव व प्रादेशिक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)शिकार कुठे झाली?तीन वर्षाच्या वाघाची शिकार कुठे झाली, छत्तीसगड राज्यातील मुख्य तस्कर तन्ने खॉ याने भंडाऱ्यातील मरसकोल्हे व बाभरे या दोन आरोपींशी त्याची ओळख कशी? यापूर्वी एका वनगुन्ह्यात मरसकोल्हे हा आरोपी होता. त्यामुळे या वाघाची शिकार कुठे करण्यात आली, यादिशेने वन विभागाचा शोध सुरू आहे.
वाघाच्या कातडीसह तस्करांना अटक
By admin | Updated: July 29, 2014 00:53 IST