मुंबई : राज्यात स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी तब्बल ४९ ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पाच अभ्यास गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्थापन केले. स्मार्ट सिटीबाबत जनतेच्या इच्छाआकांक्षादेखील जाणून घेतल्या जाणार आहेत. स्मार्ट सिटी विकास आराखडा, स्मार्ट व्यवसाय प्रक्रिया, स्मार्ट एकात्मिक माहिती तंत्रज्ञान या विषयांवर अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी नगरविकास विभागाच्या (१) प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. स्मार्ट सिटीबाबत जनतेच्या इच्छाआकांक्षा प्रतिबिंबित करणाऱ्या अहवालाचे स्वरूप ठरवून त्यावर आधारित स्मार्ट सिटी विकास आराखडा तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सुचविणे हे या अभ्यास गटाचे काम असेल. या गटात एकूण १४ अधिकारी असतील.स्मार्ट शहरांमध्ये विविध नागरी व व्यावसायिक सुविधा कमी खर्चात पुरविण्यासाठी धोरण निश्चित करण्याची जबाबदारी नगर विकास विभागाचे (२) सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे असेल. त्यात १८ अधिकारी असतील. खासगी क्षेत्राच्या सहभागातून विकसित होणाऱ्या नवीन स्मार्ट सिटीसाठी प्रशासनिक व्यवस्था सुचविणे, ही शहरे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य कशी ठरतील याचे धोरण ठरविणे हेही या गटाचे काम असेल. (विशेष प्रतिनिधी)
स्मार्ट सिटीला स्मार्ट टीम्स!
By admin | Updated: February 10, 2015 02:57 IST