प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४/१५ हे वर्ष साखर कारखान्यांसाठी आर्थिक कडवट बनत चालले आहे. या हंगामात ऊसदर भागविण्यासाठी आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँकेने सहाव्यांदा साखरेच्या मूल्यांकनात घट केली असल्याने सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.हंगाम २०१४/१५ ची सुरुवात नोव्हेंबर २०१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचे दर सर्वसाधारण ३००० ते ३१०० रुपये होते. यावेळी राज्य बँकेने साखर कारखान्यांना उत्पादित होणाऱ्या प्रतिक्विंटल साखर पोत्यावर २८५० रुपये उचल देण्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर हंगाम सुरू होताच साखरेच्या दरात सतत घसरण सुरू झाली. आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१४ मध्ये असणारे ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर घसरून ते जानेवारी २०१५ मध्ये २८०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यावेळी राज्य बँकेने बाजारातील साखरेच्या दराचा विचार करून दिली जाणारी प्रतिक्विंटल उचल कमी करून २७३० रुपये केली.यानंतर फेब्रवारी २०१५ मध्ये साखरेच्या दरात पुन्हा घसरण होऊन हे दर २६५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यावेळी राज्य बँकेने साखर मूल्यांकनात घट करून २५३० रुपये उचल जाहीर केली. मात्र, ही साखर दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. मार्चमध्ये साखरेचे दर २४५० रुपये प्रतिक्विंटल झाले. यामुळे पुन्हा राज्य बँकेने बाजारातील साखरेच्या दराचा विचार करून २३३० रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये साखरेचे दर पुन्हा २२५० ते २२२३ रुपये प्रतिक्विंटलवर आल्यानंतर पुन्हा साखर मूल्यांकन घटवून २२७५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आले.सध्या बाजारातील साखरेचे दर २२५० ते २३०० रुपयांवर स्थिर असले, तरी पुढील काळात साखरेचे दर घसरण्याची शक्यता गृहित धरून पुन्हा साखर मूल्यांकन १०० रुपये प्रतिक्विंटल कमी केले असून, सर्वच कारखान्यांना प्रतिक्विंटल २१७० रुपये साखर मूल्यांकन करण्यात आल्याचे राज्य सहकारी बँकेकडून कळविण्यात आल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. पुढील हंगामात कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी शक्यता साखर उद्योगातून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये२१७० रुपये प्रतिक्विंटल साखरेची उचल राज्य बँकेने जाहीर केली, तरी त्याच्या ८५ टक्के म्हणजे १८३६ रुपये प्रतिक्विंटल ऊसदर देण्यासाठी दिले जातात. त्यातून कारखान्याने पूर्वी उचललेल्या कर्जाचे व्याज, उत्पादन खर्च असे ५०० रुपये अगोदरच कमी करून घेतले जातात, तर २५० रुपये इतर कपात, असे ७५० रुपये कपात करून साखर मूल्यांकनाच्या २१७० पैकी केवळ ११७५ रुपयेच ऊसदर देण्यासाठी कारखानदारांच्या हातात राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी एफआरपी २४०० ते २६७५ आहे. हे पाहता १३०० ते १५०० रुपये प्रतिटन ऊसदर देण्यासाठी कारखानदारांना कमी पडणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.व्यापाऱ्यांकडून साखर दरासाठी प्रचंड लॉबिंग साखर उत्पादन झाले असताना त्याला मागणी मात्र त्या प्रमाणात नसल्याने साखर कारखानदार हवालदिल झाले आहेत. सध्या साखरेच्या पडलेल्या दराचा फायदा उठविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून लॉबिंग होत असून, कारखान्यांच्या साखर टेंडरला प्रतिसाद मिळेना. व्यापारी दर पाडण्यासाठीच साखर खरेदी करत नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे.पॅकेजनंतरही अडचणशासनाने अलीकडेच दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले, तरी यातून साखर कारखान्यांना २०० ते २२५ रुपये प्रतिटनच द्यायला कारखान्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे आणखी १००० ते १२०० रुपये कोठून उभे करावयाचे, हा यक्ष प्रश्न कारखानदारांपुढे उभा आहे.
साखर मूल्यांकनात सहाव्यांदा घट
By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST