मुंबई : मुंबईमध्ये महिलांसाठी स्वच्छ, मोफत, सुरक्षित मुताऱ्या मिळाव्यात म्हणून एक महिन्यापूर्वी सक्रिय झालेली मुंबई महानगरपालिका आता पुन्हा एकदा निष्क्रिय झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत महिला मुताऱ्यांची अवस्था बदलते आहे, असे चित्र असतानाच पुन्हा मुताऱ्यांची अवस्था जैसे थे अशीच झाली आहे. ‘महिलांसाठी मोफत मुतारी’ असा फलक सगळ््या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये लावावा, असे परिपत्रक महापालिकेने १४ आॅगस्ट रोजी काढले होते. या परिपत्रकाची अंमलबजावणी १५ दिवसांच्या आता व्हावी, असे आदेशही देण्यात आले होते. मात्र अजूनही मुंबईतील काही स्वच्छतागृहांमध्ये हा फलक लावलेला दिसत नाही, तर काही ठिकाणी कागदाचे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक सध्या अर्धवट फाटलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी फलक असूनही पैसे घेतले जात असल्याचे आरटीपी कार्यकर्त्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले.पेडर रोड येथील एका सुलभ स्वच्छतागृहामध्ये महिलांसाठी मोफत मुतारी असा फलक लावण्यात आलेला आहे. मात्र मुतारीमध्ये जाण्याआधीच ३ रुपये मागितले जातात. यावर त्यांना इथे मोफत असा फलक लावला आहे, मग पैसे कसे घेता, असा प्रश्न विचारल्यास मोफत वापरायची असल्यास पाणी मिळणार नाही़ तुम्ही तसेच जाऊन मुतारीचा वापर करा, असे सांगितले जात असल्याचे सुप्रिया यांनी सांगितले. ‘लोकमत’नेही अशाप्रकारचे स्टिंग आॅपरेशन एक महिनाभरापूर्वी केले होते. तेव्हाही मुतारीसाठी पैसे आकारले गेले होते आणि आजही तीच परिस्थिती आहे. (प्रतिनिधी)
मुंबईतल्या महिलांच्या मुताऱ्यांची अवस्था जैसे थे
By admin | Updated: October 7, 2014 08:51 IST