पूजा दामले,मुंबई- बारावीचा पेपर सुरु होण्याआधी १२ ते १५ मिनिटे पेपर व्हॉट्स अॅपवर येण्याच्या दोन घटना मुंबईत घडल्या. त्यामुळे यंदाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी व्हॉट्स अॅपची डोकेदुखी ठरत आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांना आळा घालण्यासाठी बोर्ड वर्षभर तयारी करत असते. मंगळवारपासून राज्यात सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी बोर्डाने केलेल्या तयारीविषयी बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी केलेली ही खास बातचीत...पेपर लीक होऊ नयेत म्हणून कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत? गेल्या तीन वर्षांत परीक्षा सुरु होण्याआधी काही मिनिटे व्हॉट्स अॅपवर पेपर येत असल्याचे प्रकार घडले आहे. अशा पद्धतीने पेपर लीक होऊ नये, म्हणून परीक्षा केंद्रावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल वापरास बंदी घातली आहे. पण, तरीही यंदा बारावीच्या परीक्षेवेळी पेपर लीक झाले आहेत. त्यामुळे दहावीची परीक्षा सुरु होण्याआधी विशेष सूचना देण्यात येतील. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी पेपर देण्यात येतो, त्यावेळात कुठे कमतरता आहे का? कुठे मोबाईलचा वापर करण्यात येतो याचा शोध घेण्यात येत आहे. मोबाईल बंदीचा नियम पाळला गेल्यास ही समस्या उद्भवणार नाही. दहावीच्या परीक्षेसाठी किती विद्यार्थी राज्यभरातून परीक्षेला बसलेले आहेत?यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १७ लाख ६६ हजार ९८ विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहेत. यामध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच रिपीटर विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. परीक्षा केंद्राची निवड कशी करता? दहावीच्या परीक्षा केंद्राची निवड करताना विद्यार्थ्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही, हा महत्त्वाचा निकष लावला जातो. एका केंद्रावर सर्व साधारणपणे २५० ते ३०० विद्यार्थी असतात. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था करता येण्या इतके वर्ग आहेत का? या व्यतिरिक्त अन्य खोल्या उपलब्ध आहेत का हे पाहिले जाते. राज्यभरातील शाळा जून-जुलै महिन्यांतच परीक्षा केंद्रासाठी प्रस्ताव बोर्डाकडे पाठवतात. बोर्डाचे अधिकारी शाळांची तपासणी करतात आणि नंतरच केंद्राला परवानगी दिली जाते. किती कर्मचारी बोर्डाच्या परीक्षेसाठी कार्यरत असतात? बोर्डाचे कर्मचारी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर कार्यरत नसतात. त्यांचे काम बोर्डाच्या कार्यालयात सुरु असते. दहावीच्या परीक्षेला परीक्षा केंद्र शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य कर्मचारी कार्यरत असतात. सर्व राज्यात १ लाख कर्मचारी बोर्डाच्या परीक्षांचे काम पाहात असतात. यामध्ये केंद्र निरीक्षकापासून अगदी पाणी आणून देणाऱ्या शिपायांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्रांमध्ये कशी सोय केली जाते? परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर दिव्यांग विद्यार्थी सर्टिफिकेटसह बोर्डाकडे अर्ज पाठवतात. या विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यावर त्याप्रमाणे माहिती संकलित केली जाते. परीक्षा केंद्रांना याविषयीची माहिती दिली जाते. काही परीक्षा केंद्रांवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वरच्या मजल्यावरचा वर्ग आला आणि लिफ्टची सोय नसल्यास तळमजल्यावर वेगळी सोय करण्यात येते. एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्यास परीक्षेदरम्यान त्रास झाल्यास त्यांनी बोर्डाकडे तक्रार नोंदवल्यास त्वरित कारवाई करण्यात येते. कॉपी रोखण्यासाठी कोणत्या योजना आखल्या जातात? परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक विविध केंद्रांमध्ये भेट देत असतात. त्यामुळे कॉपीची प्रकरणे पकडली जात आहेत. याचबरोबरीने पर्यवेक्षक काही कॉपीची प्रकरणे पकडतात. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडल्यानंतर त्याला दुसरी उत्तरपत्रिका देऊन पेपर सोडवण्यास दिला जातो. पेपर संपल्यानंतर त्या विद्यार्थ्याची प्राथमिक चौकशी होते. परीक्षेनंतर पुढील कार्यवाही केली जाते.>परीक्षेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो ? परीक्षेचा फॉर्मही आता आॅनलाईन पद्धतीने भरला जातो. त्यानंतर एक यादी तयार करुन पुन्हा शाळांमध्ये पाठविली जाते. या यादीत काही चुका असतील तर त्यांची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर शेवटची यादी तयार करण्यात येते. निकालही आॅनलाईन पद्धतीने लावला जातो. मेसेज आणि संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आधी निकाल मिळतो. त्यानंतर निकाल विद्यार्थ्यांना हातात मिळतो.
दहावी परीक्षा सुरळीत पार पाडणार - म्हमाणे, बोर्डाचे अध्यक्ष
By admin | Updated: March 6, 2017 02:32 IST