लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सध्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भरघोस गुणांमुळे त्यांच्या आई-वडिलांनाही आनंद वाटतो. पण, विद्यार्थ्यांचे खरे गुण कळणे महत्त्वाचे आहे. शिक्षणमंत्री या नात्याने या भरघोस गुणांवर रोख लावण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.सरस्वती फाउंडेशन व स्मार्ट पुणे यांच्या वतीने सरस्वती मंदिर संस्थेच्या सर्व शाखांमधील रात्र प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ बाजीराव रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. रवींद्र जोशी अध्यक्षस्थानी होते. सरस्वती मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक आंबेकर, उपकार्याध्यक्ष प्रसेनजित फडणवीस, सहचिटणीस सु. प्र. चौधरी, प्रा. अविनाश ताकवले आदी मान्यवर उपस्थित होते.जावडेकर म्हणाले, ‘‘परिस्थितीशी संघर्ष करीत दिवसभर काम करून रात्र प्रशालेत शिकणाऱ्या मुलांचे कौतुक करताना मनाला विलक्षण आनंद होत आहे. शिक्षणाला मदत करण्यासारखे दुसरे पवित्र काम नाही. वंचित समाजाला शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. मागच्या वर्षीदेखील मी वेळात वेळ काढून मुंबई येथील रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.’’या कार्यक्रमात पूना नाईट स्कूल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट ज्युनियर कॉलेज, सरस्वती मंदिर नाईट स्कूल, सुशीला बावधनी ज्युनियर कॉलेज, चिंतामणी रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांमधील १२ विद्यार्थ्यांचा पुस्तके वाटून सत्कार करण्यात आला. यामध्ये रेखा शिरसाठ, पीयूष नितीन घोरपडे, नेहा टक्के, अक्षय माने, वैष्णवी पिंगळे आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
भरघोस गुणांवर लावणार रोख, प्रकाश जावडेकर यांचे संकेत
By admin | Updated: June 25, 2017 05:01 IST