निम्मेच मनुष्यबळ : नाईक तलाव, टेका नाका अतिसंवेदनशीलराहुल अवसरे - नागपूर स्वातंत्र्यापूर्वीचे पाचपावली पोलीस ठाणे हे आजही झोपडपट्ट्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे परस्परातील भांडणे आणि मारामाऱ्यांचे गुन्हे या ठाण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घडतात. प्राप्त माहितीनुसार, या पोलीस ठाण्याची स्थापना १९२५-२६ या काळात झालेली आहे. अलीकडच्या काळात या ठाण्याचे विभाजन होऊन जरीपटका आणि यशोधरानगर, असे दोन भाग झाले. मारामाऱ्याच अधिकघरगुती भांडण, शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणांवरून परस्पर भांडण आणि या भांडणांचे मारामाऱ्यात होणारे पर्यवसान यासाठी या ठाण्याला दररोजच मोठी दमछाक करावी लागते. त्यामुळे गुन्ह्याचा आलेखही वाढता आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दंगा, जबरीचोरी, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या २३५ घटनांची २०११ मध्ये नोंद करण्यात आली होती. २०१२ मध्ये ३१४, २०१३ मध्ये ३६० आणि आतापर्यंत २७१ घटनांची नोंद करण्यात आलेली आहे. शहर पेटवणारा टेका नाकाया ठाण्याच्या क्षेत्रात ५ मंदिर, १५ मशीद, २९ बुद्धविहार असून नाईक तलाव आणि लेंडी तलाव, असे दोन जुने तलाव आहेत. कमाल चौकात मोठी बाजारपेठ आहे. इंदोरा आणि आवळे बाबू या दोन चौकांना आंबेडकरी क्रांतीचे चौक म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या घाटकोपर येथील पुतळा विटंबनेचे लोण पसरून पाचपावली भागाला मोठा फटका बसला होता. नामांतर आणि खैरलांजी हत्याकांडविरोधी आंदोलनाचा भडका इंदोरा चौकातूनच उडाला होता. १९६५ मध्ये संपूर्ण नागपुरात पसरलेल्या जातीय दंगलीची सुरुवातच टेका नाका भागातून झालेली होती. बराच काळपर्यंत टेका नाका भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या राहुट्या पाहायला मिळत होत्या. अतिरेक्यांनी केला होता स्फोट१९९० च्या काळात इंदोरा चौकात घडलेल्या एका दहशतवादी घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले होते. एका सायकलच्या सीटखाली जिलेटिन बॉम्ब ठेवून स्फोट घडविण्यात आला होता. या विध्वंसक स्फोटात प्राणहानी झाली नव्हती, मात्र या परिसराला जबर हादरा बसला होता. जसवंत टॉकीजच्या शोरूमच्या काचांना तडे गेले होते. पुढे हा स्फोट खलिस्तानवाद्यांनी केल्याचे निष्पन्न होऊन एका अतिरेक्यास अटक करून आणण्यात आले होते. गुन्हेगारीच्या दृष्टीने कमाल चौकाचा परिसर संवेदनशील समजला जातो. उत्तर नागपुरातील एका टोळीचा म्होरक्या अनिल पाटील याचा कॅफेरुफमध्ये त्याच्या प्रतिस्पर्धी इंदूरकर टोळीकडून निर्घृण खून करण्यात आला होता. अशाच प्रकारे दिवसाढवळ्या काके सरदार याचाही खून करण्यात आला होता. एक एमपीडीए, सहा तडीपारया पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी १८ फेब्रुवारी २०१४ पासून आपला कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी सहा गुन्हेगारांना तडीपार केले असून, जेन्टिल सरदार नावाच्या कुख्यात गुन्हेगाराला महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, घातक व्यक्ती कायद्यांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे या भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. ‘हेवी’ पोलीस ठाणे निम्मे मनुष्यबळ१२ चौरस कि.मी. एवढे या पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे. कडबी चौक, कामठी मार्गावरील मारुती शोरूम ते इतवारी रेल्वेस्थानककडे जाणारा मार्ग ते मेहंदीबाग उड्डाणपूल रेल्वे गेट ते मस्कासाथ पूल ते कोलकाता रेल्वे लाईन ते मोतीबाग ते कडबी चौक, अशा या पोलीस ठाण्याच्या सीमा आहेत. एकूण ३ लाख ८० हजार लोकसंख्या असून, त्यांच्या सुरक्षेचा भार सांभाळण्यासाठी सध्या ११ पोलीस अधिकारी आणि १२१ कर्मचारी ठाण्यात तैनात आहेत. अर्थात २ हजार १२१ लोकांमागे एक पोलीस कर्मचारी आहे. अत्यंत ‘हेवी’ पोलीस ठाणे म्हणून या पोलीस ठाण्याचा उल्लेख होतो. १४ पोलीस अधिकारी आणि १९६ पोलीस कर्मचारी एवढा मनुष्यबळ मंजूर असताना, निम्म्यावर मनुष्यबळ तैनात आहेत. या पोलीस ठाण्याच्या मोतीबाग, लष्करीबाग, आसीनगर, राणी दुर्गावतीनगर, बारसेनगर, नाईक तलाव, वैशालीनगर आणि पंचशीलनगर, अशा सहा बीट पाडण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी नाईक तलाव आणि टेका नाका हा भाग अतिसंवेदनशील समजल्या जातो.
झोपडपट्ट्यांचा वेढा - गुन्हेगारांचा तिढा
By admin | Updated: July 15, 2014 01:16 IST