डहाणू/बोर्डी : घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले असून, भोवताली पावसाचे पाणी वाहत असल्याने परिसर धोकादायक बनला आहे. अन्य पर्यायां अभावी नाईलाजस्तव रु ग्णांना जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढात उपचार घ्यावे लागतात. लोकमतच्या माध्यमातून येथील समस्येचा सातत्याने वेध घेतला जात आहे. मात्र जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने स्थानिक आदिवासी रुग्णांची स्थिती दयनीय बनली आहे. डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्याच्या कक्षेत अकरा उपकेंद्रांचा समावेश आहे. त्यामध्ये आदिवासी लोकसंख्या सुमारे नव्वद टक्के आहे. गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा आदिंमुळे घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी चर्चेत राहिले आहे. या मधील काही समस्या सुटणार असल्याचे वरिष्ठपातळीवरून सांगण्यात येते. परंतु ते होणार कधी? हे कुणालाच सांगता येत नाही. डहाणू सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी न केल्याने आरोग्य केंद्राच्या भोवताली खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय घोलवड ग्रामपंचायतीने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा करण्यास कायमस्वरूपी गटार केली नसल्याने परीसराला पाण्याचा वेढा असतो. त्यामुळे उपचाराकरिता येणारी लहान बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती आदींना जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढत उपकेंद्रापर्यंत जावे लागते. (वार्ताहर)>पुरस्कार नाही, सुविधा तरी द्या!नुकताच पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. मात्र घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड कोणत्याच प्रकारात झालेली नाही. येथील नागरिकांना पुरस्कार न मिळाल्याचे दु:खं नाही. मात्र विविध आजाराने त्रस्त महिला रुग्ण, गर्भवती आणि स्तनदा माता यांना होणारा त्रास जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले आणि मुख्यकार्यकरी अधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन समजून घेणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आरोग्य केंद्राला पाण्याचा वेढा
By admin | Updated: July 20, 2016 03:49 IST