मुंबई/अहमदनगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे़ ते यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व शिर्डी संस्थानने ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे़जिल्ह्यातील एका गावाची निवड करून तेथे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे़ त्याचप्रमाणे साई संस्थानच्या ठरावाची प्रत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आल्याची माहिती नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़हा ठराव अंतिम मंजुरीसाठी उच्च न्यायालयाला पाठविला जाणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. व्यावसायिकांनी एखादे गाव दत्तक घेऊन ते दुष्काळमुक्त केले तर त्याचे संपूर्ण श्रेय त्यांना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी)
‘सिद्धिविनायक’, ‘साईबाबा’ पावले !
By admin | Updated: March 28, 2015 01:32 IST