अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तुलनेत वेतन मात्र तुटपुंजेच आहे. त्यामुळे नवा वेतन करार मंजूर करून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तरतूद करून त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्य दाखवावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यस्तरीय ५१ व्या वार्षिक अधिवेशनाचे रविवारी येथे पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पवार म्हणाले की, १९८२ नंतर येथे दुसऱ्यांदा अधिवेशन होत आहे. हा श्रमिकांचा, कामगार चळवळींचा जिल्हा आहे. त्यामुळे अधिवेशनातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची नक्कीच दखल घेतली जाईल. एसटी कामगार संघटनेने फक्त कर्मचाऱ्यांचीच नाही, तर सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या एसटीचीही काळजी घेतली. त्यामुळेच आज तिचे अस्तित्व टिकून असून ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा. तसे झाले नाही, तर राष्ट्रवादी पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करेल. गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी संघटनेच्या मागण्यांचा विचार करण्याचे सरकारच्या वतीने आश्वासन दिले.
वेतन कराराबाबत गांभीर्य दाखवा
By admin | Updated: April 6, 2015 03:14 IST