मुंबई : विधान परिषद बरखास्तीचे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार अनिल गोटे यांना सरकार आणि पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तीन दिवसांत खुलासा मागवण्यात आला आहे. त्यांनी खुलासा न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली.मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरही अनिल गोटे सभागृहाबाहेर विधान परिषदेबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या प्रकरणी गोटे यांच्याविरोधात सभापतींनी स्वत:हून हक्कभंग ठराव स्वीकृत करावा, अशी मागणी त्यांनी केली. वारंवार समज देऊनही सदस्य ऐकत नसेल तर त्याला कायद्याचा धडा शिकवला पाहिजे, असे शिवसेना सदस्य अनिल परब म्हणाले. (प्रतिनिधी)
भाजपा आमदार गोटे यांना कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: April 2, 2017 01:32 IST