कळंबोली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या रुंदीकरणासाठी रस्ते विकास महामंडळाने अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र याठिकाणी बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेली अनेक दुकाने भाड्याने देण्यात आली आहेत. भाडे वसुली करणाऱ्यांनी महामार्गावरील दुकाने तोडण्याऐवजी ती मागे हटवली आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्नही सुटला आहे, शिवाय दुकानांचे भाडे यापुढेही सुरूच राहणार आहे. कळंबोली सर्कल ते कोन या दरम्यान एनएच-४ महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. याकरिता निविदा प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच एजन्सी नियुक्त करून काम सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र या दरम्यान काही स्थानिक मंडळींनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केले आहे. त्या ठिकाणी स्टॉल उभारून ते भाड्याने दिले आहेत. येथे कलिंगड, पीओपी, फर्निचर, नर्सरीचे दुकान थाटण्यात आले आहेत. खांदा वसाहतीतील रस्त्यावरील या दुकानांमधून महिन्याला लाखोंची कमाई होत आहे. अतिक्र मण हटविण्याकरिता पोलीस, महसूल आणि इतर यंत्रणांबरोबर समन्वय सुरू आहे. त्याचा धसका घेवून दुकाने हटवून ती त्यांनीच मागे घेतली आहेत. परंतु तेही अतिक्रमण असल्याने कारवाई करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
राष्ट्रीय महामार्गावरील दुकाने बॅकफूटवर
By admin | Updated: June 29, 2016 02:11 IST