कणकवली : जैतापूर प्रकल्प रद्द करू यांसह अनेक आश्वासने निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने जनतेला दिली होती. मात्र हा प्रकल्प ते रद्द करू शकले नाहीत, हा त्यांचा नाकर्तेपणा आहे. जैतापूर प्रकल्प रद्द करण्याची क्षमता शिवसेनेत नसून हा ढोंगी पक्ष आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.ओसरगाव येथील महिला भवनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारीणीची बैठक गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ओसरगाव येथे आलेल्या नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या जैतापूर प्रकल्पाविषयीच्या आंदोलनावरून प्रतिक्रिया दिली. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, शिवसेना हा जनतेची दिशाभूल करणारा पक्ष आहे. सत्ता भोगून आंदोलन करणे हा निव्वळ नाटकीपणा आहे. शिवसेनेचे हे नाटक जनतेला कळलेले आहे. कोकणातील जनता सूज्ञ असून शिवसेनेचा ढोंगीपणा न कळण्याइतपत येथील जनता अज्ञानी राहिलेली नाही. सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्याच सत्तेच्या विरोधात आंदोलन करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेना घेत आहे. त्यांची ताकद असेल तर त्यांनी जैतापूर प्रकल्प रद्द करून दाखवावा. राज्याबरोबरच देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. मात्र, केंद्र आणि राज्य शासन अनेक निर्णय चुकीच्या पद्धतीने घेत आहे. जनतेला वेठीस धरले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करून सत्तेत राहून आंदोलन करण्याचे नाटक शिवसेना करीत आहे. (वार्ताहर)जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यतत्पर बनाजनसामान्यांना महागाईबरोबरच अनेक समस्या भेडसावत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आता कार्यतत्पर बनावे. पक्षाने जबाबदारी दिल्यास मुंबई- बांद्रा येथून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे. मात्र असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व मी करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे. पक्ष संघटना बळकटीबरोबरच जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही नारायण राणे यांनी ओसरगाव येथील जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र, या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नसल्याने अधिक तपशील समजू शकला नाही.सत्तेत योग्य वाटा न मिळाल्यानेच आंदोलनकेंद्रात आणि राज्याच्या सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही किंवा मुंबईत योग्य सेटलमेंट झाली नाही म्हणून शिवसेनेने जैतापूरचे आंदोलन केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. जैतापूर प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे. मग हे आंदोलन कशासाठी? शिवसेनेला राज्यात योग्य खाती मिळाली असती तर असे आंदोलन केले असते का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैतापूर प्रकल्प होणारच, अशी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंचे मोदींसमोर काही चालत नाही, हे एकप्रकारे दाखविणारे शिवसेनेचे आंदोलन आहे, असे यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.
शिवसेना हा ढोंगी पक्ष
By admin | Updated: March 19, 2015 23:50 IST