यदु जोशी, नागपूरशिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबईत चार जागा निश्चित केल्या असून त्यात शिवाजी पार्कजवळील दोन जागांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक हैदराबाद हाऊसमध्ये आज सकाळी झाली. समितीने आतापर्यंत शिवाजी पार्कजवळील कॅडल रोडवरच्या दोन जागा, परळ येथे बॉम्बे डार्इंग गोडाऊनची जागा आणि वडाळा येथील मिठागाराची जागा अशा चार जागा निश्चित केल्या आहेत. यातील पहिल्या दोन जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. त्यातील एक महापौर बंगल्याच्या बाजूला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारांचे सोने वाटले ते शिवाजी पार्क मैदान बाजूलाच आहे. याच शिवाजी पार्कवर बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या ठिकाणी चबुतरा उभारण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की स्मारकाची उभारणी ट्रस्ट उभारून करावी की संपूर्णपणे शासनाच्या नियंत्रणाखाली करावी, अशा दोन पर्यायांंवर समितीने विचार केला आहे. स्मारकाच्या संचालनाबाबतही असेच दोन पर्याय आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या धर्तीवर या स्मारकाचे संचालन करण्याचा विचार सुरू आहे. ट्रस्ट करण्यात आले तर त्यात शासनासह ठाकरे परिवारातील काही सदस्यांचा समावेश केला जाईल.समितीच्या कार्यवाहीबाबतची माहिती स्वाधीन क्षत्रिय हे येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. त्यानंतर फडणवीस हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. स्मारकाचे स्वरूप कसे असावे याबाबत उद्धव ठाकरेंचा सल्ला शासन घेणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. या स्मारकाची उभारणी राज्य शासनाच्या पैशातून करावी की ट्रस्टच्या माध्यमातून, मुंबई महापालिकेने काही आर्थिक भार उचलावा का या बाबतदेखील समितीने विचार केला आहे पण अंतिम निर्णय अर्थातच मुख्यमंत्री फडणवीस घेतील.आजच्या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, श्रीकांत सिंह, कोकणचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांचा दिमाखदार पुतळा, त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे कायमस्वरूपी दालन, एक सभागृह आणि मराठी माणूस व मराठी भाषेच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे एक दालन असे स्मारकाचे स्वरूप असावे का यावरही विचार सुरू आहे.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कजवळ!
By admin | Updated: December 17, 2014 03:04 IST