संदीप प्रधान, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ‘व्हॅलेंटाईन डे’ला बारामतीत एका व्यासपीठावर येणे तसेच शिवसेनेच्या ई-लर्निंग योजनेकडे दुर्लक्ष करून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेली चर्चा या घटनांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. विदर्भापासून सुरू होणाऱ्या शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क’ मोहिमेत भाजपाने दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता झाली त्याचा आढावा घेऊन अांदोलनात्मक पाऊल उचलण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी शिवसेना नेते, पदाधिकारी यांना दिले आहेत.शिवसेनेने पाठिंबा दिल्याने राज्यातील सरकार स्थिर झाले असतानाही मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शरद पवार यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून आहेत. पवार यांच्या निमंत्रणावरून मोदी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी (१४ फेब्रुवारी) बारामतीला जाणार आहेत. अमित शहा यांनी ब्रीच कँडी इस्पितळात जाऊन अलीकडेच पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पवार यांच्याशी सलगी दाखवण्यामागे शिवसेनेवर सतत दबाव निर्माण करणे हाच भाजपाचा हेतू असल्याचे शिवसेनेचे मत झाले आहे.विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी दोनवेळा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेची ई-लर्निंगची योजना ही त्याच उद्देशाकरिता असताना त्याचा स्वीकार करण्याचे संकेत द्यायचे सोडून राज यांना महत्त्व देण्यामागे शिवसेनेवर दडपण आणणे, हाच उद्देश असल्याचे शिवसेनेला वाटते.शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क’ मोहिमेअंतर्गत भाजपाने निवडणूक प्रचार काळात केलेल्या घोषणा, विशेषत: शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता व कृषी मालास भाव देण्याबाबत केलेल्या घोषणांचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्यांची पूर्ती झालेली नसेल, अशा घोषणांचा पाठपुरावा करून त्यांच्या पूर्तीसाठी भाजपाला भाग पाडायचे, अशी व्यूहरचना शिवसेनेची आहे.
पवार, राज यांच्याशी दोस्तीमुळे भाजपावर शिवसेना नाराज
By admin | Updated: January 26, 2015 04:21 IST