ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची चांगलीच कोंडी केली असून या पदासाठी शिवसेनेने नीलम गो-हे यांना उमेदवारी दिली आहे. आता मतदानात भाजपा शिवसेनेला साथ देते की राष्ट्रवादीला याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अविश्वास ठराव मांडला होता. हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी भाजपा आमदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली होती. तर शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. आता विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक होणार असून या निवडणुकीत शिवसेनेने नीलम गो-हे यांना उमेदवारी देत भाजपाची कोंडी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रामराजे निंबाळकर, काँग्रेसतर्फे शरद रणपिसे ही निवडणूक लढवत आहे. देशमुख यांच्याजागी राष्ट्रवादीला सभापतीपद हवे होते व यात त्यांना भाजपाची साथ मिळत होती. पण आता शिवसेनेनेही ही निवडणूक लढवण्याची स्मार्ट खेळी करत भाजपाची कोंडी केली. आता युती धर्म पाळत भाजपा शिवसेनेला साथ देते की राष्ट्रवादीला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २८ आमदार आहेत. काँग्रेसचे २१ तर भाजपाचे १२ आमदार आहेत. तर शिवसेनेकडे अवघ्या सात आमदारांचे पाठबळ आहेत. त्यामुळे शिवसेनेने फक्त भाजपाची कोंडी करण्यासाठी ही खेळी खेळल्याच चर्चा सुरु झाली आहे.