कामशेत : काही दिवसांवर आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गावोगावी बैठकांना सुरुवात झाली आहे. शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनासाठी तरुण वर्ग एकत्रित येत आहे. नाणे, पवन व आंदर मावळातील अनेक गावे व कामशेत शहरातील शिवप्रेमी येत्या १५ मार्चला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या तयारीला लागले आहेत. दर वर्षी तिथीनुसार सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीत नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करून आपली शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी तरुणांची तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत भगवे झेंडे व छत्रपती शिवाजीराजांचे फोटो, मूर्ती दाखल झाल्या आहेत.अनेक गावांमध्ये कार्यक्रमांची आखणी चालू असून रोज रात्री मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये कार्यक्रमाचे नियोजनावर खलबते सुरु आहेत. कामाच्या जबाबदारी निश्चित करण्यात येत आहेत. परिसरातील युवक वर्ग हिरिरीने यात सहभाग घेत आहेत. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. एक गाव एक शिवजयंती याप्रमाणेही काही मंडळे शिवजयंती साजरी करण्याचा विचार करत असल्याचे दिसत आहे. बाजारपेठांमध्ये भगवे झेंडे व इतर साहित्य विक्रीस आलेले दिसत आहे. शिवजयंतीसाठीची लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात झाली असून अनेकजण सढळ हाताने वर्गणीच्या पावत्या फाडत आहेत. परीक्षेचा काळ सुरू झाल्याने अनेक तरुणांना इच्छा असूनही यात तयारीत सहभागी होता येत नसल्याचे दिसत आहे. नुकत्याच बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या असल्याने परीक्षार्थी तरुणांना बैठकांमध्ये भाग घेता येत नाही. मंगळवारी दहावीच्या परीक्षा सुरु होणार असल्याने आपल्याला या वेळी शिवजयंतीत सहभागी होता येणार नसल्याने अनेक मुले नाराजी व्यक्त करीत आहेत. मात्र, मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे ते सांगत आहेत. (वार्ताहर)>शिवज्योत : मिरवणुकीची तयारीमावळ परिसरात लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग, राजमाची, कोराईगड, धनगड आदी इतिहासाची साक्ष देणारे किल्ले आहेत. या व इतर दूरवरच्या किल्ल्यांवरून सकाळी सकाळी आपल्या गावापर्यंत शिवज्योत व भगवे झेंडे वाजत-गाजत-मिरवत आणले जातात. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमा, पुतळ्यास विविध प्रकारे आरास-सजावट करून ढोल-लेझीमच्या गजरात गावामधून मिरवणूक काढली जाते. शिवजयंतीनिमित्त व्याख्याने, पोवाडे व विविध स्पर्धांचे आयोजन गावागावांत केले जाते. अशा विविध कार्यक्रमांच्या आखणीत मंडळाचे कार्यकर्ते सध्या गुंतले आहेत. तयारीला वेग आल्याने सर्वत्र शिवजयंतीची धामधूम सुरू असल्याचे दिसत आहे.
शिवजयंती तयारीची धामधूम
By admin | Updated: March 6, 2017 01:18 IST