पुणे : अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक डॉ. शेषराव मोरे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ५ व ६ सप्टेंबरला संमेलन होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यास नकार दिला. त्यानंतर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. शेषराव मोरे यांची नावे चर्चेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. मात्र, चपळगावकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे डॉ. मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मोरे यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास होकार कळविला असून, तसे संमतीपत्र महामंडळाला पाठविले आहे, असे वैद्य यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील जांब बुद्रूक (ता. मुखेड) हे डॉ. मोरे यांचे जन्मगाव आहे. १९९९मध्ये परभणीत झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (प्रतिनिधी)
विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरे
By admin | Updated: July 11, 2015 01:41 IST