चिकणघर : २७ गावांत आता संघर्ष समिती आणि स्थानिक शिवसेना यांच्यात पत्रकयुद्ध सुरू झाले आहे. दोन्हीकडून आपल्या भूमिका मांडणारी पत्रके २७ गावांत फिरत आहेत.२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची घोषणा ७ सप्टेंबरला झाल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या संघर्ष समितीला ९ सप्टेंबरला निवडणूक आयोगाने शासनाचा आदेश लागू नसल्याचे जाहीर करून धक्का दिला. हे शिवसेनेने घडविल्याचा समज करून समितीने शिवसेनेच्या निषेधाचे फलक लावले. यानंतर, शिवसेनेने पोलिसांत धाव घेऊन ते फलक काढायला लावले. यानंतर, मात्र शिवसेना स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात आहे, हे आपोआप सिद्ध झाले. मात्र, स्वतंत्र पालिकेविषयी ठाम असणाऱ्या संघर्ष समितीने १३ सप्टेंबरला आणखी एक नवीन पत्रक काढून निवडणूक झालीच तर कडक बहिष्कार टाकण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. याच पत्रकात यापूर्वी संघर्ष समितीचा घटक असणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर कडक शब्दांत टीका केली आहे. गावांचा समावेश झालाच तर महापौरपदाचे गाजर दाखवले असल्याने संघर्ष समितीशी गद्दारी केली, असा आरोप करण्यात येत आहे. समितीचा रोख स्थानिक शिवसेना नेते प्रकाश म्हात्रे यांच्यावर असून म्हात्रे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
शिवसेना-संघर्ष समितीचे २७ गावांत पत्रकयुद्ध
By admin | Updated: September 14, 2015 02:11 IST