मुंबई/रायगड : इंद्राणी मुखर्जीने रायगड पोलिसांना विश्वासात घेऊन शीना बोराची हत्या केली का, असा धक्कादायक प्रश्न निर्माण झाला आहे. मे २०१२ मध्ये गागोदे खिंडीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर रायगडचे तत्कालिन पोलीस अधिक्षक आर. डी. शिंदे यांनी पेण पोलिसांना तपास थांबविण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले. त्यानुसार चौकशीही सुरू झाल्याचे समजते.सुरूवातीपासूनच या प्रकरणात रायगड पोलिसांनी टप्प्याटप्प्यावर कर्तव्यात कसूर केल्याचे पुरावे पुढे आले आहेत. मृतदेह मिळाला, नमुने जेजे रूग्णालयात धाडले अशी नोंद पोलिसांनी पेण ठाण्यातल्या डायरीत केली. त्यासोबत तत्कालिन ठाणे प्रमुखाने अधिक्षकांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई थांबवण्यात येत आहे, असे टीपण नोंदवल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमधून समोर आल्याने आणखी खळबळ उडाली आहे.हा मृतदेह सुमारे ७० टक्के जळालेल्या अवस्थेत होता. त्याचवेळी पेण पोलिसांना संशय यायला हवा होता. नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये पोलीस थेट हत्येचा गुन्हा नोंदवून तपास करतात किंवा अपघाती मृत्यूची नोंद करून वैद्यकीय अहवालांनुसार पुढील कारवाई करतात. मात्र पेण पोलिसांनी फक्त डायरी एन्ट्री करून मृतदेहाचे काही अवशेष चाचणीसाठी जेजे रूग्णालयात धाडले. हे अवशेष जळालेल्या अवस्थेत असल्याने चाचणी करण्यातील असमर्थता जेजे रूग्णालयाने पेण पोलिसांना कळवली होती. मात्र त्यानंतर पेण पोलिसांनी जेजे रूग्णालयाशी काहीएक संपर्क केला नाही, उलट काही दिवस वाट पाहून पेण पोलिसांनी हा मृतदेह पुरला.प्रकरण हाताळण्यातला निष्काळजीपणा व शिंदेंचे तपास थांबविण्याचे आदेश यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मृतदेहाबाबत तपास थांबवणे हा शिंदेंचा हलगर्जीपणा होता की शीना बोराची हत्या करणाऱ्यांनी शिंदेंनाही विश्वासात घेतले होते, असा थेट आरोप होऊ लागला आहे. देशभरातल्या अनेक माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी पेण पोलिसांची ही कृती म्हणजे कर्तव्यातील कसूर असल्याचे म्हंटले आहे. शिंदे सध्या मुंबईत अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. रायगडचे सध्याचे पोलीस अधिक्षक महोम्मद सुवेझ हक यांनी शुक्रवारी संध्याकाळी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पेण पोलिसांनी त्यावंळी हत्येचा गुन्हा किंवा अपघाती मृत्यूची नोंद केली नव्हती, अशी माहिती दिली.वरिष्ठांच्या उपस्थितीत पुरला होता मृतदेहशीना बोरा हिचा खून झाल्याचे आता म्हटले जात आहे, परंतू सन २०१२ मध्ये मी पेण पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना, गागोदे खिंडीत एक मानवी सांगाडा असल्याची तक्रार आल्यावर मी माझ्या पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचलो होतो.अर्धवट जळलेल्या या सांगाड्यावरुन काहीही निष्पन्न होऊ शकत नव्हते. मी पेणच्या सरकारी डॉक्टरांना घटनास्थळी बोलावले होते़ स्थानिक ग्रामस्थांना पंच बनवून पंचनामा केला होता. मृताचे कोणीही नातेवाईक पुढे आले नाहीत. अखेर रितसर पंचांसमक्ष मृतदेह पूरण्यात आला.यावेळी माझे वरिष्ठ अधिकारी देखील माझ्या सोबत होते, अशी माहिती पेण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरिक्षक व सध्या पुण्यात पोलीसांच्या जातपडताळणी विभागात कार्यरत असलेले सुरेश मिरघे यांनी ‘लोकमत’ला दिली़
पोलिसांना विश्वासात घेऊन शीना हत्याकांड
By admin | Updated: August 30, 2015 02:14 IST