मुंबई : एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीत आता मुलांप्रमाणे मुलींनाही समान हक्क मिळणार असल्याचे उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने स्पष्ट केले आहे़ यातील २००५ आधी जन्मलेल्या मुलींना हा हक्क मिळणार की नाही याचाही वाद न्यायालयाने सोडवला असून या सालच्याआधी व नंतर जन्मलेल्या सर्व मुलींना हा हक्क मिळणार आहे़ मुख्य न्यायाधीश मोहित शहा, न्या़ एम़ एस़ सोनक व न्या़ एम़ एस़ संकलेचा यांच्या पूर्णपीठाने हा निकाल दिला़ महत्त्वाचे म्हणजे या पूर्णपीठासमोर केवळ एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीत मुलींना हक्क मिळणार की नाही एवढचा मुद्दा होता़ तसेच वडीलांच्या मालमत्तेत मुलींना समान हक्क देण्याची तरतूद १९५६ मध्ये दिली असून यावर कधीही कोणीच आक्षेप घेतला नव्हता़ यासंदर्भात याचिकाही दाखल नव्हती़ उलट न्यायालयाने वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नोकरीवरही विवाहीत मुलगी दावा करू शकत असल्याचा निर्वाळा दिला आहे़ महत्त्वाचे म्हणजे एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीत स्त्रियांंना काहीच हक्क नव्हता़ या मिळकतीवर केवळ पुरूषांचाच हक्क होता़ अगदी कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास त्याच्या वाटणीचा हिस्सा देखील त्याच्या पत्नी व मुलीला मिळत नव्हता़ मात्र १९५६ साली हिंदू वारसा हक्क कायद्याने एकत्रित कुटुंबातील पुरूषाच्या निधनानंतर पत्नी व मुलीला त्याचा हिस्सा देण्याची तरतुद केली़त्यानंतर पुरूष व स्त्री समान हक्काच्या मुद्याची लाट संपूर्ण देशात आली़ एकत्रित कुटुंबाच्या मिळकतीवरील पुरूषांची मक्तेवादी मोडीत काढून काही राज्यांनी स्वतंत्रपणे या मिळकतीत स्त्रियांनाही समान हक्क दिला़ महाराष्ट्रानेही १९९४ मध्ये अशी तरतुद केली़ त्यापाठोपाठ संसदेनेही २००५ मध्ये अशीच तरतुद करून या मिळकतीत समान हक्क दिला़ मात्र ही तरतुद नेमकी कधीपासून लागू होईल, याचे स्पष्टीकरण संसदेने दिले नाही़ ही तरतुद संसदेने केल्याने सर्व राज्यांना ती लागू होते़ यामुळे याबाबत अनेक तर्कविर्तक झाले़ काही राज्यातील उच्च न्यायालयांनी ही तरतुद पूर्वलक्षीप्रभावाने लागू होईल, असे जाहिर केले तर काही न्यायालयांनी २००५ नंतर ही तरतुद लागू होईल, असे स्पष्ट केले़ अशाच प्रकारची काही प्रकरणे न्या़ राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली़ (प्रतिनिधी)
एकत्रित कुटुंबात मुलींनाही हिस्सा
By admin | Updated: August 16, 2014 02:20 IST