पंकज रोडेकर / ठाणेमीरा रोड कॉल सेंटर प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॅगी हा दुबईव्यतिरिक्त अन्य कोणत्याच देशात गेला नसल्याचे सांगत असला तरी, त्याचे हाँगकाँगमध्ये बँक खाते असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. मात्र, त्याच्या पासपोर्टवर तो चीनमध्ये गेल्याची नोंद नसल्याने पोलीसही संभ्रमात आहेत. यासंदर्भात ठाणे पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.कॉल सेंटरप्रकरणी ८ एप्रिल रोजी शॅगीला ठाणे पोलिसांनी अटक केली. याचदरम्यान, त्याने न्यायालयीन कोठडीपेक्षा पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. १४ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, तपासात त्याची विविध १० बँकांमध्ये खाती आहेत. या खात्यांमध्ये जवळपास ४० लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्याचे आणखी एक बँक खाते हाँगकाँग येथे असल्याची माहिती पुढे आली. मात्र, तो तपासात दुबईव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात गेला नसल्याचे सांगत असताना, या बँक खात्याने पोलीस संभ्रमात पडले आहेत. त्याच्या पासपोर्टवर हाँगकाँगला गेल्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यादृष्टीने पोलीस कसून तपास करीत आहेत. कोणत्याही देशात गेल्यावर पासपोर्टवर त्या देशाचा स्टॅम्प मारला जातो. पण, चीनमध्ये विदेशी प्रवाशांच्या पासपोर्टवर स्टिकर लावण्यात येत असल्याचे समजते. असे असेल तर, शॅगीने स्टिकर काढले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
शॅगीचे हॉँगकाँगमध्ये बँक खाते
By admin | Updated: April 28, 2017 03:32 IST