ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. ७ - कांदिवलीत समता नगर परिसरात असलेल्या दामू नगर झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत एका लहान मुलासह आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत एक हजार घरे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. ४० -५० सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट झाल्याने या आगीने भीषण स्वरूप धारण केले. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १६ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवायला अग्निशमन दलाला चार तास लागले. दाट लोकवस्तीच्या या झोपडपट्टीत लागलेल्या आगीमुळे इतर घरांमधील सिलेंडरचेही एकामागोमाग स्फोट झाले व त्यामुळे आग आणखीनच भडकली.
या भागात अनेक गोदामे आहेत. दाट वस्ती असल्यामुळे अग्निशमन दलाला दुर्घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला.