मुंबई : डॉक्टरांवरील मारहाणीचे प्रकार थांबविण्यासाठी मुंबईतील चार शासकीय आणि महापालिकेच्या चार रुग्णालयांत सप्टेंबरपासून ५६ पोलीस तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले. ५६ सुरक्षा रक्षकांमध्ये पोलीस व होमगार्ड्सचा समावेश असेल. त्यात शस्त्रधारी, शस्त्र नसलेले, पुरुष आणि महिला पोलीस किती असणार आहेत, याचा निर्णय पोलीस आयुक्त घेतील, असे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहायुक्त डॉ. प्रकाश वाकोडे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आयसीयू, अपघात विभाग आणि बाह्य रुग्ण विभागावर सतत लक्ष ठेवतील. राज्य सरकारने महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाला पत्र लिहून सुरक्षा लेखापरीक्षण करण्याची विनंती केली आहे. महामंडळ सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून सुरक्षा रक्षक नेमू शकतील, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जे.जे., सायन, नायर, सेंट जॉर्ज, जी.टी. या रुग्णालयांत दोन शस्त्रधारी पोलीस नेमण्यात येणार आहेत. तर के.ई.एम. रुग्णालयात चार शस्त्रधारी पोलीस नेमण्यात येणार असल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.एप्रिल महिन्यात मार्डने संप पुकारल्याने त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते आफक मांडविया यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. (प्रतिनिधी)
शासकीय रुग्णालयांत सप्टेंबरपासून बंदोबस्त
By admin | Updated: July 9, 2016 02:16 IST