मुंबई : मराठी साहित्य विश्वातले ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचे विलेपार्ले येथे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते मधुमेहाने आजारी होते. प्रकृती खूप बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते.नलेश पाटील यांचा जन्म २९ जानेवारी १९५४ रोजी मुंबई येथे झाला. पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या जे.जे. इन्स्टिटयूट आॅफ अप्लाईड आर्ट या संस्थेत झाले. त्यानंतर त्यांनी एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नोकरी केली. हमाल दे धमाल, टूरटूर चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते.ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र यांच्यासोबत नलेश पाटील यांनी ‘कवितांच्या गावा जावे’ या उपक्रमातून काव्यवाचनाचा कार्यक्रम केला. कविवर्य ना.धो. महानोरांनंतर निसर्ग कविता वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे कवी म्हणून नलेश पाटील यांची ओळख होती. नलेश पाटील यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)