ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा ( वय ७७) यांचे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईतील निवासस्थानी कर्करोगाने निधन झाले. देवरा यांच्या जाण्याने काँग्रेसने महाराष्ट्रातील एक अनुभवी नेता गमावला आहे. देवरा यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देवरा यांचे पार्थिव दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत मुंबई काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल, अशी माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे.
गांधी परीवाराशी अत्यंत जवळिक असलेल्या व त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या मुरली देवरा यांचा मुंबई काँग्रेसवर दबदबा राहिला. देवरा हे १९८१ ते २००३ असे २२ वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. देवरा यांच्यामुळेच दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. देवरा यांचा वारसा पुढे नेत असेलेले मिलिंद देवरा यांनीही पित्याप्रमाणेच हायकमांडवर आपली छाप पाडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांच्या सरकारमधून प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवरा यांनी विश्रांती घेतल्यानंतर मिलिंद देवरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.
राज्यसभेचे सदस्य असलेल्या मुरली देवरांचे सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी सौहार्दाचे संबंध होते. कुणाशीही अगदी विरोधकांशीही ममत्वाने वागणारे देवरा मृदुभाषी म्हणून ओळखले जात. विरोधकांशीही कधीही कटुता येऊ न देणा-या देवरा यांच्या जाण्यामुळे एक चांगल्या स्वभावाचा राजकारणी गमावल्याचे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेले अनेक दिवस कर्करोगाशी देवरा झुंज देत होते. अखेर कर्करोगाशी लढतानाच सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवरा यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. एक निष्ठावंत नेते असलेले मुरली देवरा त्यांच्या मृदू स्वभावामुळे सर्व पक्षात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाचे वृत्त एकून खूप दु:ख झाले. कालच आपण त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती असेही मोदींनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देवरा यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तर देवरा यांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले, त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही देवरा यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुरली देवरा यांचा अल्पपरिचय :
मुरली देवरा यांचा जन्म १९३७ साली झाला. बीएचे शिक्षण घेतल्यानंतर ते समाजेसेवेशी जोडले गेले. १९६८ साली त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली. १९६८ ते १९७८ पर्यंत ते मुंबई नगर निगम काऊंसलर होते. त्यानंतर शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे त्यांनी १९७७ ते १९७८ या कालावधीत मुंबईच्या महापौरपदाची धुराही सांभाळली. १९८० साली देवरा यांनी प्रथमच लोकसभा निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. १९८१ ते २००३ अशी २२ वर्षे मुरली देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९८२ साली ते काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषदेचे सदस्य बनले. १९८५, १९८९ आणि १९९१ साली त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली मात्र १९९६ व १९९९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी त्याचा मुलगा मिलिंद देवरा याला राजकारणात उतरवले. त्यानंतर २००४ सालची निवडणूक जिंकत मिलिंद देवरा लोकसभेत गेले. २००६ साली मुरली देवरा यांची मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये वर्णी लागली व ते केंद्रीय पेट्रोलियम मंत्री बनले.