पुणे : बँकेत पैसे भरण्याच्या स्लीपवर नोटांचे क्रमांक लिहिण्याच्या बहाण्याने दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ४३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंढवा येथे राहणाऱ्या ७१ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे. येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत सकाळी १०.१५ ते १०.३० या वेळेत हा प्रकार घडला. फिर्यादी सकाळी बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. ते पैसे भरण्यासाठीच्या रांगेत उभे असताना त्यांच्याजवळ दोघे जण आले. बँकेच्या नवीन नियमानुसार स्लीपवर नोटांचे क्रमांक लिहावे लागतात, असे सांगून त्यांनी स्लीपवर क्रमांक लिहिण्यासाठी नोटा घेतल्या. या नोटा हाताळत असताना फिर्यादीची नजर चुकवून दोघांनी ५०० रुपयांच्या ८७ नोटा काढून घेतल्या. त्यानंतर दोघेही बँकेतून पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एम. एस. फुंदे तपास करीत आहे.
ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
By admin | Updated: April 29, 2016 01:05 IST