ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - गेल्या १५ वर्षांमध्ये भाजपा-शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्या, याला शिवसेना कारणीभूत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी एका कार्यक्रमात केला आहे. आमच्या दोघांच्या मिळून १४० जागा होत्या, त्या १३० वर आल्या, त्यानंतर ८५ - ९० जागांपर्यंत युतीच्या जागा आल्या. कारण शिवसेनेने जागाबदलांबाबत लवचिकताच दाखवली नाही आणि भाजपा शिवसेना युतीच्या जागा कमी कमी होत गेल्याचे जावडेकर म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे असते तर आज युती तुटली नसती असे सांगत प्रकाश जावडेकरांनी युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरसंघचालकांचं भाषण दूरदर्शनवर लाइव्ह दाखवल्याबद्दल व त्यावर झालेल्या टीकेबद्दल बोलताना जावडेकर म्हणाले की आरएसएस ही धार्मिक नाही तर सामाजिक संघटना आहे. तसेच दूरदर्शननं काय दाखवायचं व काय नाही याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे सरकारी प्रसारमाध्यमं जी काँग्रेसच्या काळात दबलेली होती, ती आम्ही मुक्त केली असल्याचा दावा जावडेकरांनी केला आहे.
आमचा लढा शिवसेनेशी नसून आमचा लढा काँग्रेस व राष्ट्रवादीसी असल्याचं सांगत जनता कुशासनाला त्रस्त झाली असल्यानं आम्हाला बहुमतानं निवडून देईल असा विश्वासही जावडेकरांनी व्यक्त केला.
यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना जावडेकर म्हणाले की शरद पवार पावणेपाच वर्षे सेक्युलर असतात, आणि निवडणुका आल्या की तीन महिने अत्यंत जातीयवादी असतात. मोदींवर शरद पवार करत असलेली टीका म्हणजे ते या निवडणुकांना अत्यंत घाबरत असल्याचे द्योतक असल्याचे जावडेकर म्हणाले.