संदीप प्रधान, मुंबईकेंद्रातील मंत्रीपदावर लाथ मारून शिवसेनेने महाराष्ट्रातील सत्तेच्या वाट्याकरिता चिकाटी कायम ठेवल्याने आणि भाजपापुढे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का, असा सवाल करीत नैतिक पेच उभा केल्याने भाजपाचे नेते अक्षरश: हैराण झाले आहेत. मोदींच्या सर्वशक्तीमान नेतृत्वापुढे नांगी न टाकण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्येही जोशाचे वातावरण आहे.विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला तेव्हाही शिवसेनेने आपली ‘मिशन १५१’ ची घोषणा सोडली नाही. नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन नेत्यांपुढे देशातील भल्याभल्या नेत्यांनी नांगी टाकली असताना शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा भाजपाला करायला लावली. निवडणुकीत मोदी व भाजपाने तुफान शक्ती लावल्यानंतरही त्यांना संपूर्ण बहुमत मिळवण्यात शिवसेनेने अडसर निर्माण केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ६३ आमदार विजयी झाले. आताही सत्ता स्थापनेकरिता शिवसेना सहज तयार होईल, अशी भाजपाची अपेक्षा होती. शिवसेनेने महाराष्ट्रातील सत्तेच्या वाट्याचा आग्रह धरला असताना केंद्रात मंत्रीपद देऊन तूर्त शिवसेनेच्या मागणीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न भाजपाने करून पाहिला. मात्र अनिल देसाई यांना मंत्रीपदाची शपथ न घेण्याचा आदेश देऊन शिवसेनेने आपल्याकरिता केंद्रातील नव्हे तर महाराष्ट्रातील सत्ता प्रमुख आहे व त्याकरिता वेळप्रसंगी आम्ही मंत्रीपदावर लाथ मारु शकतो, असे ठाकरे यांनी दाखवून दिले. शिवसेनेच्या पवित्र्यामुळे भाजपाचे महाराष्ट्रातील सरकार सतत अस्थिरतेच्या गर्तेत राहणार आहे. त्यामुळे सत्ता मिळूनही भाजपाला त्याचे सूख लाभणार नाही, असा बंदोबस्त शिवसेनेने केला आहे. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सत्ता टिकवली तर भाजपाची बदनामी होणार आहे. त्याचवेळी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तर जुन्या मित्राशी दगाबाजी केल्याच्या आरोपांचे त्यांना धनी व्हावे लागणार आहे.
सेनेच्या चिकाटीने भाजपा हैराण
By admin | Updated: November 10, 2014 04:30 IST