ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 30 - शहादा तालुक्यातील सावळदा परिसरातील काही गावांमध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सावळदा येथील भूकंप मापक केंद्रावर एक रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली.दुपारी पावणे तीन ते तीन वाजण्याच्या सुमारास सावळदा, शहादा शहर, अनरद, मामाचे मोहिदा, शेल्टीसह परिसरात काही गावांमध्ये नागरिकांना भूकंपांचा सौम्य धक्का जाणवला. परंतु त्यात कुठेही पडझड झाली नाही. कर्णोपकर्णी ही बाब परिसरात पसरली. तातडीने प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. सावळदा येथे असलेल्या भूकंप मापक केंद्रावर नोंदी तपासल्या असता त्यात एक रिश्टर स्केलची नोंद दाखविण्यात आली. या प्रकाराची सायंकाळपर्यंत नागरिकांमध्ये चर्चा होती. दरम्यान, प्रशासनाने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.